Videocon चे सीईओ वेणुगोपाल धूत यांना अटक; ‘या’ प्रकरणात CBI ची मोठी कारवाई

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सीबीआयकडून सध्या ठिकठिकाणी मोठ्या उद्योजकांवर कारवाई केली जात आहे. आता बँक कर्ज फसवणूकप्रकरणी सीबीआय (CBI) कडून मोठी कारवाई करण्यात आली असून व्हिडिओकॉनचे मालक वेणुगोपाल धूत यांना अटक केली आहे. आयसीआयसीआय बँक कर्ज घोटाळा प्रकरणातील ही तिसरी अटक आहे. यापूर्वी या प्रकरणी सीबीआयने बँकेच्या माजी एमडी चंदा कोचर आणि त्यांचे पती दीपक कोचर यांना अटक केली होती. त्यानंतर आता वेणुगोपाल धूत यांच्यावरही कारवाई केली आहे.

सीबीआय (CBI) च्यावतीने मुंबईत राहत असलेल्या व्हिडिओकॉनचे मालक वेणुगोपाल धूत यांच्या घरावर छापा टाकण्यात आला. यावेळी धूत यांना त्यांच्या निवासस्थानातून अटक करण्यात आली. दरम्यान धूत यांना विशेष CBI कोर्टात हजर केले जाणार आहे. चंदा कोचर आयसीआयसीआय बँकेच्या प्रमुख असताना त्यांनी व्हिडिओकॉन समूहाला कर्ज दिले होते. या बदल्यात चंदा यांचे पती दीपक कोचर यांच्या नु रिन्युएबल कंपनीला व्हिडिओकॉनकडून गुंतवणूक मिळाली.

व्हिडिओकॉन ग्रुपला तब्बल 3 हजार 250 कोटी रुपयांचे बँक कर्ज दिल्याप्रकरणी सीबीआयने गेल्या आठवड्यात ICICI बँकेच्या माजी एमडी आणि सीईओ चंदा कोचर आणि त्यांचे दीपक कोचर यांना अटक केली होती. यानंतर मुंबईतील विशेष न्यायालयाने दोघांनाही तीन दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली. सीबीआय कोठडीत असलेले चंदा कोचर आणि दीपक कोचर यांचा रिमांड आज संपणार आहे. त्यांनाही सीबीआय आज कोर्टात हजर करण्याची शक्यता आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?

व्हिडिओकॉनचे मालक वेणुगोपाल धूत यांना सीबीआयकडून आज अटक करण्यात आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. नेमकं प्रकरण काय याबाबत अनेक तर्क वितर्क लढवले जात आहेत. 2012 मध्ये व्हिडिओकॉन ग्रुपला आयसीआयसीआय बँकेद्वारे लोन देण्यात आले होते. हे प्रकरण नंतर एनपीए झाले. 2020 मध्ये ईडीने या प्रकरणात दीपक कोचर यांना अटक केली. 2012 मध्ये चंदा कोचर यांच्या नेतृत्वात ICICI बँकेने Videocon ग्रुपला 3250 कोटींचं कर्ज दिलं.त्यानंतर वेणुगोपाल धूत प्रमुख असलेल्या सुप्रीम एनर्जीने मेसर्स न्यूपॉवर रिन्यूएबल्सला 64 कोटींचं लोन दिले. या कंपनीत दीपक कोचर 50 टक्के भागिदारी होती.

ICICI बँक आणि व्हिडिओकॉनचे भागधारक अरविंद गुप्ता यांनी पंतप्रधान, रिझर्व्ह बँक आणि सेबी यांना पत्र लिहून व्हिडिओकॉनचे अध्यक्ष वेणुगोपाल धूत आणि आयसीआयसीआय सीईओ आणि एमडी चंदा कोचर यांच्यावर एकमेकांची बाजू घेत असल्याचा आरोप केला. धूत यांच्या कंपनी व्हिडिओकॉनला आयसीआयसीआय बँकेकडून 3250 कोटी रुपयांचे कर्ज देण्यात आले आणि त्या बदल्यात धूत यांनी चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर यांच्याद्वारे चालवल्या जाणाऱ्या पर्यायी ऊर्जा कंपनीमध्ये पैसे गुंतवले.