हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्र कर्नाटक सीमावादावरून राज्यातील राजकारण ढवळून निघालं आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना 48 तासांचा अल्टिमेटम देत जर परिस्थिती सुधारली नाही तर तर मलाही बेळगावला जावं लागेल असा इशारा दिला होता, त्यावर शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी निशाणा साधत पवारांवरच टीका केली आहे.
4 वेळा तुम्ही मुख्यमंत्री होता तेव्हा कर्नाटक महाराष्ट्र सीमाप्रश्न सुटला नाही आणि आता 48 तासांत प्रश्न सुटेल? असा सवाल शिवतारे यांनी केला. आजही हा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. त्यामुळे तुम्ही जाऊन काय करणार ? उगीच लोकांची माथी भडकवायची आणि पवारांना राजकारण करायचं आहे असेही ते म्हणाले.
शरद पवार नेमकं काय म्हणाले होते?
महाराष्ट्रातील गाड्यांवर कर्नाटकात हल्ला झाल्यांनतर शरद पवारांनी पत्रकार परिषद घेतली होती. येत्या 24 तासात कर्नाटक सरकारकडून महाराष्ट्राच्या तसेच मराठी भाषिक जनतेवर हल्ले करणं थांबलं नाही तर परिस्थिती चिघळू शकते. महाराष्ट्रातील जनतेच्या संयमाचा बांध फुटला तर त्याला सर्वस्वी केंद्र सरकार आणि कर्नाटक सरकार जबाबदार असेल असा इशारा शरद पवारांनी दिला होता. तसेच येत्या 48 तासात मराठी भाषिकांवरील अन्याय थांबले नाहीत तर मलाही बेळगावला जावं लागेल असं म्हणत पवारांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना अल्टिमेटम दिला होता.