शरद पवारांचा पद्मविभूषण माघारी घेणार आहात कां? विक्रम ढोणे यांचा सवाल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सागंली मिरज आणि कुपवाड महानगर पालिकेच्यावतीने उभारण्यात आलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारकाचे उद्घाटन ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते करण्याला भारतीय जनता पक्षाने विरोध केला आहे. मात्र तो विरोध करण्याचा नैतिक अधिकार भाजपला नाही. पवार हे भाजपच्यादृष्टीने नैतिकता नसलेले राजकारणी असतील तर भाजप सरकारने पवारांना पद्यविभूषण सन्मान देऊन कां गौरविले, याचे उत्तर आधी द्यावे, तसेच प्रवक्ते गोपीचंद पडळकर यांच्यामुळे नवीन साक्षात्कार झाला असेल तर भाजप सरकार पद्मविभूषण सन्मान परत घेणार आहे का, त्यासाठी भाजपचे नेते प्रयत्न करणार आहात काय, असा सवाल धनगर विवेक जागृती अभियानाचे संयोजक विक्रम ढोणे यांनी केला आहे.

सांगली येथील अहिल्यादेवी स्मारकाचे उदघाटन २ एप्रिल २०२२ रोजी करण्याचे नियोजन महापालिकेने केले आहे. या कार्यक्रमाला ज्येष्ठ नेते शरद पवार यांना निमंत्रित केल्याने भाजपने विरोधाची भुमिका घेऊन २७ मार्च २०२२ रोजी जबरदस्तीने स्मारकाचे उदघाटन करण्याचा घाट घातला आहे. या संघर्षातून अहिल्यादेवींच्या स्मारकाची अवहेलना होण्याची शक्यता असल्याने धनगर विवेक जागृती अभियानाने आंदोलनाची भुमिका घेतली आहे. भाजप प्रवक्ते गोपीचंद पडळकर हे सातत्याने वादग्रस्त विधाने करून सामाजिक तेढ वाढवत असल्याच्या पार्श्वभुमीवर त्यांची संभाव्य स्टंटबाजी आणि नौटंकी लक्षात घेता जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक आणि महापालिका आयुक्तांनी योग्य ती खबरदारी घ्यावी आणि स्मारकाचे संरक्षण करावे, या मागणीची लेखी निवेदने संबंधितांना दिलेली आहेत. तसेच जेजुरी येथील गुन्ह्यात पडळकर यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणीही विशेष पोलिस महानिरीक्षकांकडे केली आहे.

यासंदर्भाने दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात ढोणे यांनी म्हटले आहे की, अहिल्यादेवी होळकर स्मारक उदघाटनावरून सुरू असलेला वाद वेदनादायी आहे. भारतीय जनात पक्ष यानिमित्ताने गलिच्छ राजकारण करत आहेत. भाजपचे प्रवक्ते गोपीचंद पडळकर यांच्या माध्यमातून कारस्थाने सुरू आहेत. पडळकर यांनी गेल्यावर्षी जेजुरी येथे अहिल्यादेवी पुतळा अनावरण कार्यक्रमापुर्वी हुल्लडबाजी करून स्मारकाची अवहेलना केली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल होऊनही पडळकर व सहकाऱ्यांवर कारवाई झालेली नाही. पोलिसांच्या नेभळट भुमिकेमुळे पडळकरांची विकृती दिवसेंदिवस वाढता निघाली आहे. त्यामुळेच सांगलीतील अहिल्यादेवींच्या कार्यक्रमाला गालबोट लावण्याचे नियोजन पडळकर यांनी केलेले आहे. यानिमित्ताने धनगर समाजाच्या अज्ञानाचा गैरफायदा घेतला जात आहे.

शरद पवार यांच्याहस्ते उदघाटन घ्यायचे की अन्य कोणाच्या हस्ते, हा निर्णय पालिकेचा आहे. मात्र हे उद्घाटन शरद पवार यांच्याहस्ते करायचे नाही, हे सांगण्याचा अधिकार भाजपला नाही. ज्या भाजपचे सर्वोच्च नेते नरेंद्र मोदी हे शरद पवारांना गुरू मानतात, तसेच त्यांच्या सरकारने शरद पवार यांना पद्यविभूषण हा नागरी सन्मान देऊन गौरविले आहे. शरद पवार यांचे गोडकौतुक केल्यावर ते अपवित्र कसे ठरतात, हे अगोदर भाजपने सांगावे. स्वतः मोदी व मोदी सरकारने याप्रकरणी माफी मागावी व नंतर अहिल्यादेवींच्या पुतळा अनावरण करण्यासाठी कोण अपात्र आहे, याचे मार्गदर्शन भाजप नेत्यांनी करावे. पडळकर हे चार वर्षापुर्वी भाजपचे खासदार संजय पाटील यांच्यावर किती खालच्या पातळीवरची टीका करते होते, हे संपुर्ण जिल्ह्याला माहिती आहे. आता तेच संजय पाटील आणि पडळकर भाजपमध्ये एकत्र नांदत आहेत. पडळकरांसारखी सांगली भाजपलादेखील भुमिका राहिलेली नाही. पडळकरांची भुमिका बरोबर होती की चूक, हे सांगण्याचे धाडसही एकाही भाजपच्या नेत्यात नाही.

पडळकर हे कोणाचे ऐकण्याच्या मनःस्थितीत नसतात. त्यांनी चार वर्षांपुर्वी एसटीचे सर्टिफिकेट हातात देणार…अशी भाषणे करून धनगर समाजाच्या पाठीत खंजिर खुपसला. देवेंद्र फडणवीस यांच्याशी सेटलमेंट करून आमदारकीचा तुकडा मिळवला. त्या तुकड्यापोटी पडळकर यांनी आपले तोंड फडणवीस यांना भाड्याने दिले आहे. फडणवीस हे ज्यांच्या प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पाठिंब्यावर दोनदा मुख्यमंत्री झाले ते पवारांच्या राष्ट्रवादीच्या जीवावरच, हे संपुर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. फडणवीस दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले तेव्हा हेच पडळकर लाजलज्जा सोडून राष्ट्रवादीच्या पाठिंब्याचे समर्थन करत होते. फडणवीसांच्या खिशात असलेल्या पडळकरांकडून वैचारिक चर्चा अपेक्षितच नाही. धनगर एसटीप्रश्नी फडणवीसांनी केलेल्या फसवणूकीवर व स्वतः केलेल्या गद्दारीवर चर्चा होऊ नये म्हणून पडळकर सातत्याने स्टंटबाजी करत आहेत. जेजुरीत पडळकरांनी केलेला गुन्हा अक्षम्य असा आहे. त्यामुळे सांगलीत दुसरा गुन्हा करण्याच्या प्रयत्नात असलेल्या कांगावाखोर पडळकरांना प्रशासनाने इंगा दाखवावा.

महिनाभरापुर्वी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ज्याप्रमाणे छत्रपती शिवराय, महात्मा जोतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याविषयी अवमानकारक पद्धतीने व्यक्तव्ये केली, तशी वक्तव्ये अहिल्यादेवींवर कोणी केली असतीतर आम्हीही आक्षेप घेतला असता. त्यामुळे शासकीय कार्यक्रमात कोणताही धांगडधिंगा होऊ नये, स्मारकाची अवहेलना होऊ नये, अशी आमची भुमिका आहे. भाजप व पडळकर हे धांडगधिंगा करण्यास यशस्वी झाले तर प्रशासनाचा निषेध म्हणून २७ मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करणार असल्याचे ढोणे यांनी सांगितले.

भाजपचे बिंगल फुटले

अहिल्यादेवी स्मारकप्रश्नी भाजप विकृत राजकारण करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. पहिल्या बैठकीत सर्वांनी एकत्रित कार्यक्रम करायचा, अशी भुमिका भाजपची होती. पडळकरांच्या एन्ट्रीनंतर विरोध सुरू झाला. त्यांच्या बैठकीत माजी आमदार नितीन शिंदे यांनी केलेले वक्तव्य समाज माध्यमांवर व्हायरल झाले आहे. भाजपला मते मिळावीत, म्हणून श्रेयवाद सुरू असल्याचे शिंदे सष्टपणे बोलत असल्याने भाजपचे बिंग फुटले आहे, असे ढोणे यांनी म्हटले आहे.

Leave a Comment