शहीदाची बायको – प्रा. हरी नरके

1
135
IMG
IMG
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

स्वातंत्र्यदिन विशेष | पुणे कोल्हापूर महामार्गावर कामेरी नावाचं गाव लागतं. ते सांगली जिल्ह्यातलं वाळवा तालुक्यातलं इस्लामपूरच्या जवळचं गाव आहे. बागायती शेती करणार्‍या कष्टाळू आणि झुंजार लोकांचं गाव. लढावू लोकांचं गाव. अब्दुल रहमान अंतुले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना १९८० साली त्यांनी स्वातंत्र्य चळवळीत शहीद झालेल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मरणार्थ त्यांच्या गावी स्मारक उभारण्याचं ठरवलं.

कामेरीत शहीद स्मारकाचं काम सुरू झालं. कंत्राटदारानं काही मजूर कामावर लावलेले होते. एक म्हातारी मजूर आजारी होती. तिच्या अंगात अंगात खूप ताप होता. तिच्याच्यानं घमेली उचलण्याचं काम होत नव्हतं. कंत्राटदारानं घरी जाऊन आराम करा, दवापाणी घ्या असं तिला सांगितलं. म्हातारी म्हणाली, “बाबा, दिवसभर काम केलं तरच संध्याकाळी माझी चुल पेटंल. मी आज काम केलं नाही तर खाऊ काय? मला काम करू दे बाबा, मी पाया पडते तुझ्या.” म्हातारीचा तोल जात होता. दोनदा तिनदा ती पडतापडता वाचली. म्हातारी काम करताना पडली तर अपघात होईल आणि आपल्या डोक्याला विनाकारण ताप व्हायचा, म्हणून कंत्राटदार चिडला आणि त्यानं तिला हाताला धरून कामावरून बाहेर काढलं. म्हातारीनं त्याचं पाय धरलं, विनवणी करीत म्हणाली “लेकरा, अरं, सरकार ज्यांचं हे स्मारक बांधतंया त्या शहीदाची मी बायको हायं रं!”

कंत्राटदार चरकला. म्हातारीला घेऊन तो दवाखान्यात गेला. डॉक्टरांनी म्हातारीला तपासलं. औषधं दिली. कंत्राटदाराला सांगितलं, आजार खूप गंभीर आहे. म्हातारी चार दिवसांचीच सोबतीन आहे. त्याच आजारात बाई लवकरच गेल्या. स्मारक पुर्ण झालेलं त्या बघू शकल्या नाहीत.

होय, त्या शहीद विष्णू भाऊ बारप्टे यांच्या वृद्ध पत्नी होत्या. अन्नाला मोताद झालेल्या. मजुरीवर पोट भरणार्‍या.

९ आगष्ट १९४२ ला महात्मा गांधीजींचा “चले जाव” चा नारा आला. कामेरीच्या तरूणांनी हातात तिरंगा घेऊन “वंदे मातरम, इन्किलाब जिंदाबाद, ब्रिटीशराज चले जाव” अशा घोषणा देत पोलीस चौकीवर मोर्चा काढला. त्या मोर्च्याचा नेता होते, तरूण विष्णू भाऊ बारप्टे.

ब्रिटीश पोलीस अधिकारी जनरल डायरचा भाऊबंध होता. तो भडकला. तुम्हाला काय पायजे? असं त्यानं विचारलं. निधड्या छातीचे विष्णू भाऊ बारप्टे म्हणाले, ” आझादी पाहिजे.” हे घे, म्हणत त्यानं थेट छातीत गोळी झाडली. विष्णू भाऊ बारप्टे जागेवरच शहीद झाले.

बारप्टे यांचं नुकतंच लग्न झालेलं होतं. माहेरातून कामेरीला आलेली त्यांची तरूण पत्नी विधवा झाली. ब्रिटीश पोलीसांनी तिचाही अपार छळ केला. बाई काही काळ गाव सोडून परागंदा झाल्या. पुढं स्वातंत्र्य मिळालं. बाई गावी परत आल्या. मजुरी करून जगू लागल्या.

स्वातंत्र्य सैनिकांना सरकारनं ताम्रपट दिले. मानधन सुरू केलं. “आपलं माणूस राहिलं नाही, आता त्या ताम्रपटाचा काय उपयोग? फुकटचं मानधन मला नको” म्हणून बाणेदार बाई, मजुरी करून पोट भरायच्या. बाईंनी आयुष्यभर विधवापण सोसलं. अंगावर निभावलं. जवानी जाळीत निभावलं. ती शहीदाची बायको होती.

क्रांतीदिन आणि स्वातंत्र्यदिन यांच्या निमित्ताने या लढाऊ, झुंझार शहिदपत्नी, स्मृतीशेष बायजाबाई बारप्टेंना विनम्र अभिवादन. कृतज्ञ वंदन!’

 

Hari Narke Articles

प्रा. हरी नरके

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here