सातारा जिल्ह्यात 6 नगरपंचायतीसाठी थंडीच्या कडाक्यात मतदान प्रक्रिया सुरू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

सातारा जिल्ह्यातील सहा नगरपंचायती साठी आज मतदान होत असून सकाळी 7.30 वाजल्यापासून मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. सध्या थंडीचा कडाका असल्यामुळे मतदानाला थंड प्रतिसाद असल्याचे सकाळी दिसून आले. या निवडणुकीसाठी 113 मतदान केंद्र असून 266 उमेदवारांचे नशीब आज मतपेटीत बंद होणार आहे. तब्बल 78 जागांसाठी ही निवडणूक प्रक्रिया होते आहे.

साताऱ्यातील लोणंद, खंडाळा, पाटण, कोरेगाव, दहिवडी आणि वडूज या नगरपंचायतसाठी आज निवडणूक प्रक्रिया पार पडते आहे. यामध्ये पाटण नगरपंचायतीमध्ये गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, कोरेगाव नगरपंचायतीसाठी आमदार शशिकांत शिंदे आणि आमदार महेश शिंदे, दहिवडी नगरपंचायतीसाठी आ. जयकुमार गोरे व त्यांचे बंधू शेखर गोरे तर लोणंद आणि खंडाळा नगरपंचायतीसाठी आमदार मकरंद पाटील यांच्या प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे.

आज होत असलेल्या नगरपंचायतीत महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेले काॅंग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना हे स्वतंत्र लढताना पहायला मिळत आहे. पाटणमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी पुरस्कृत पाटणकर गट आमनेसामने तर दहिवडीत गोरे बंधू भाजप आणि शिवसेना पक्षाच्या माध्यमातून समोरे आहेत. लोणंद आणि खंडाळा येथे काॅंग्रेस आणि राष्ट्रवादी या आघाडीत दोन पक्ष आमने- सामने आहेत. कोरेगाव येथे राष्ट्रवादी आणि शिवसेनेत लढत होत आहे. वडूज येथेही संमिश्र लढती दिसून येत आहेत. अशावेळी शिवसेना पक्ष जिल्ह्यात पहिल्यादाच गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या नेतृत्वात सर्व ठिकाणी लढताना दिसून येत आहे. राष्ट्रवादीने सर्व ठिकाणी मोठी फाैज उभी केली असून पालकमंत्री, विधानसभा सभापती यांच्यासह आमदार पायला भिंगरी लावून पळताना दिसत आहे. तर काॅंग्रेसकडून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह स्थानिकांच्या मदतीने लढताना दिसत आहेत.

Leave a Comment