कोल्हापूर प्रतिनिधी। ‘जागतिक बँक व आशियाई डेव्हलपमेंट बँक यांच्या सहकार्याने पूरस्थितीवर शाश्वत उपाययोजना केली जाणार आहे. त्यामुळे महापूर असलेल्या भागातील पाणी दुष्काळी भागात वळवले जाईल आणि महापुराचा कसल्याेही प्रकारचा फटका बसणार नाही. याच वेळी वीज, रस्ते , पाणी या मूलभूत सुविधा अव्याहतपणे कार्यरत राहणारे नियोजन केले जाणार आहे’, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी केले. इचलकरंजी येथे महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते.
ऑगस्ट महिन्यात कोल्हापूर, सांगली, सातारा या पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी आणि महापुरामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेत त्यांनी महापूरग्रस्तांना शासन सर्वतोपरी मदत करत असल्याचे सांगितले. याच वेळी त्यांनी महापूरस्थितीवर कायमस्वरूपी आणि शाश्वत प्रकारची उपाय योजना केली जाणार असल्याचे सांगितले.
ते म्हणाले, ”महाराष्ट्र कर्नाटक व तमिळनाडू या राज्यांना हक्काचे पाणी मिळते. त्याहूनही अधिक पाणी महापुरामुळे वाया जाते. जिल्ह्याच्या एका भागात महापुर आणि दुसरीकडे टँकरने पाणी पुरवठा अशी विसंगत स्थिती निर्माण आल्याचे दिसते . हे चित्र बदलण्याचा निर्धार राज्य सरकरने केला आहे. त्याकरिता जागतिक बँकेचे २३ तज्ज्ञांचे पथक पश्चिम महाराष्ट्रात महापुराचा आढावा घेऊन गेले. त्यातून अशा प्रकारची योजना नियोजन केले जाईल की वीज, पाणी पुरवठा, रस्ते, पूल हे महापूर काळातही बंद न पडता कोणत्याही अडथळ्याशिवाय सुरू राहतील. पुराचे पाणी दुष्काळी भागाला जाऊन तेथील शेतकरी सुजलाम सुफलाम होईल. या तिन्ही जिल्ह्यात पूरस्थिती येणार नाही अशी कायमची व्यवस्था केली जाणार आहे. या कामासाठी ५ ते ६ वर्षांचा अवधी लागेल. जागतिक बँक आणि आशियाई डेव्हलपमेंट बँक यांनीही या उपक्रमास सर्व प्रकारचे सहकार्य करण्याचे मान्य केले” असेही त्यांनी स्पष्ट केले.