वाझे प्रकरण : उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अनिल परब यांच्या सीबीआय चाैकशीसाठी अमित शहांना पत्र

मुंबई | निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या धक्कादायक खुलास्यातून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री अनिल परब यांची नांवे समोर आलेली आहेत. तेव्हा यांच्याविरोधात सीबीआय चौकशीची मागणी करण्याचा ठराव भाजपा प्रदेश कार्यकारिणी बैठकीत घेण्यात आला होता. त्यानंतर आता भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून चौकशीची मागणी केल्याचे ट्विट केले आहे.

प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या या मागणीमुळे आता अजित पवार आणि अनिल परब यांच्या अडचणी वाढणार का? माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यानंतर अजित पवार आणि अनिल परब यांचीही चौकशी व्हावी, अशी मागणी भाजपकडून करण्यात येत आहे. यामुळे अजित पवारांच्या अडचणी वाढणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

गृहमंत्र्यांवरील आरोपानंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री अनिल परब यांच्यावर बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे याने वसुलीचा आरोप केला. परमबीर सिंग यांच्या पत्रावरूनच माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची सीबीआय चौकशी करण्यात येत आहे. तेव्हा आता सीबीआय अजित पवार आणि अनिल परब यांचीही चाैकशी करावी, अशी मागणी भाजपा कार्यकारिणीने केली होती. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आता थेट अमित शहा यांना पत्र पाठवलं आहे.