‘या’ विधानसभा मतदार संघात आत्ताच शिवसेना- राष्ट्रवादीत जुंपली? NCP ने केली तयारीला सुरवात

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आगामी विधानसभा निवडणुकीत खानापूर-आटपाडी मतदारसंघात राष्ट्रवादीचाच आमदार करण्याचा निर्धार पक्षाने केला असल्याची माहिती राष्ट्रवादीचे नेते अ‍ॅड. वैभव पाटील व जिल्हाकार्याध्यक्ष बाबासाहेब मुळीक यांनी दिली. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा सोमवारी विट्यात दाखल होत आहे. यानिमित्त जोरदार शक्तीप्रदर्शन करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली विट्यात दाखल होणार्‍या राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेच्या स्वागताचे आम्ही जंगी नियोजन केले आहे. या परिवार संवाद यात्रेच्या स्वागताच्या माध्यमातून खानापूर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीची ताकद दाखविण्यासाठी जोरदार शक्तीप्रदर्शन करणार असल्याची माहिती वैभव पाटील यांनी दिली. या यात्रेच्या स्वागताच्या निमित्ताने खानापूर विधानसभा मतदासंघामध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचं असणार जाळं आणि राष्ट्रवादीची ताकद दाखविण्याचा आम्ही प्रयत्न करणार असल्याचं वैभव पाटील यांनी सांगितलं.

खानापूर मतदारसंघात शिवसेनेचे अनिल बाबर आमदार

खानापूर- आटपाडी मतदारसंघाचे नेतृत्व सध्या शिवसेनेचे आमदार अनिल बाबर करत आहेत. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी अपक्ष उमेदवार सदाशिव पाटील यांचा पराभव केला होता. मात्र त्यानंतर सदाशिव पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केल्यामुळे खानापूर येथील राजकारणाला नवी दिशा मिळाली असून राष्ट्रवादी काँग्रेसलाही बळ मिळाले आहे. एकीकडे राज्यात महाविकास आघाडी सरकार असल्याने शिवसेनेच्या या बालेकिल्ल्यावर राष्ट्रवादी काँग्रेस आपला दावा ठोकणार का याकडे आता लक्ष लागले आहे.