हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रातील प्रसिद्ध असणारे, जगामध्ये आश्चर्य मानले जाणारे लोणार सरोवर हे गेल्या ३-४ दिवसांपासून लाल रंगाचे झाले आहे. याबाबत जेव्हा येथील तहसीलदार सैफन नदाफ यांना समजले तेव्हा त्यांनी तात्काळ या पाण्याचे नमुने घेऊन वनविभागाला तपासणी साठी पाठविले होते. जगातील तिसऱ्या आणि देशातील पहिल्या क्रमांकाचे हे सरोवर लाल झाल्याने याची चर्चा संशोधक तसेच अभ्यासकांमध्ये होते आहे. मात्र यामुळे घाबरून जाण्याचे काही कारण नाही अशी माहिती मी लोणारकर टीमचे सदस्य तसेच पर्यावरण प्रेमी संतोष जाधव यांनी दिली आहे. एरवी उल्कापातामुळे तयार झालेल्या बेसाल्ट खडकातील या खाऱ्या पाण्याच्या सरोवराच्या गुणधर्मामुळे अभ्यासकांची रेलचेल या परिसरात असते.
नेहमी अभ्यासक आणि पर्यटक यांची गर्दी असणारे हे सरोवर गेले काही दिवस कोरोनामुळे शांत आहे. गेल्या ३-४ दिवसांपासून या सरोवराचे पाणी लाल रंगाचे झाल्यामुळे सरोवर चर्चेत आले आहे. १० ते ११ पीएच कायम असणाऱ्या या सरोवराचे पाणी कधी वाढते तर कधी कमी होते. आता या सरोवराचे पाणी लाल झाले आहे. मात्र मागच्या वर्षीदेखील दोन दिवस या सरोवराच्या पाण्याचा रंग लाल झाला होता अशी माहिती संतोष जाधव यांनी दिली आहे. डूनालिएला सलीना (dunaliella salina) या शैवालामुळे हा रंग बदलला असल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या वर्षी सरोवरातील पाण्याचे बाष्पीभवन मोठ्या प्रमाणात झाले होते. तसेच सध्याच्या दमट वातावरणामुळे हे शैवाल निर्माण झाले आहे. तसेच वातावरण पूर्ववत झाल्यावर तसेच पावसाचे ताजे पाणी सरोवरात पडल्यावर पाण्याचा रंग पूर्वीसारखा होईल असे त्यांनी सांगितले आहे.
दरम्यान लोणार सरोवर संवर्धन व विकास समितीचे सदस्य गजानन खरात यांनी ‘१०.५ पीएच असूनही या सरोवरात एक परिसंस्था तयार झाली आहे. स्पिरुलिना नावाचे घटक असणारे शैवाल या सरोवरात आहे अशी माहिती दिली. उमरिया नावाचे एक सरोवर इराणमध्ये आहे ज्याचे पाणी लाल आहे. अभ्यासातून मिळालेल्या माहितीनुसार वातावरणातील बदलामुळे पाण्याचा खारटपणा वाढून पाणी लाल होते. अशी माहिती समोर आल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या १० वर्षपासून या सरोवराचे पाणी कमी होत आहे. त्यामुळे कदाचित पाण्याचा खारटपणा वाढला असावा असे त्यांनी सांगितले. व अभ्यासातून पाणी का लाल होते आहे हे ही लवकरच समजेल असेही ते म्हणाले. मात्र पाणी लाल होत असल्याने घाबरण्याचे काही कारण नाही अशी माहिती यावेळी देण्यात आली आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.