विसर्जन विशेष- पुण्यातील प्रतिष्ठित मंडळांची मिरवणुक सुनियोजित पद्धतीने होणार; जाणून घ्या कोणता बाप्पा कधी निघणार?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे प्रतिनिधी | विशाखा महाडिक : पुणे आणि गणेशोत्सवाचे नाते अत्यंत घनिष्ट आहे. गेल्या ८ दिवसांपासून राज्यभरात गणेशोत्सवाचा जल्लोष पहायला मिळत आहे. आता २ दिवसांनी बाप्पा पुढच्या वर्षी पुन्हा येण्यासाठी यंदा निरोप घेणार आहे. दरम्यान ज्या भाविकांना दहा दिवसात बाप्पाचे दर्शन करता आले नाही ते विसर्जना दिवशी रस्त्यावर गर्दी करताना दिसतात. गणेश विसर्जनावेळी हमखास वाहतुकीच्या अडचणी होतात. यासाठी सुनियोजित पद्धतीने पुण्यातील प्रतिष्ठीत मंडळांच्या मिरवणुकी निघतात. यंदाही कार्यकर्ते आणि भाविकांच्या भावना लक्षात घेऊन अखिल मंडई मंडळ, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट, हुतात्मा बाबू गेनू गणपती मंडळ आणि जिलब्या मारुती गणपती मंडळ ट्रस्ट ही पुण्यातील प्रमुख मंडळे नियोजित वेळेत अर्थात सायंकाळी ६ नंतर विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणार आहेत. याबाबत अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.

यावेळी अण्णा थोरात यांच्यासह श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचे विश्वस्त आणि उत्सवप्रमुख पुनीत बालन, हुतात्मा बाबू गेनू गणपती मंडळ ट्रस्टचे बाळासाहेब मारणे, श्री जिलब्या मारुती मंडळ ट्रस्टचे भूषण पंड्या हे मान्यवर उपस्थित होते. मिरवणुकीच्या नियोजनाबद्दल बोलताना जिलब्या मारुती गणपती मंडळाचे भूषण पंड्या यांनी सांगितले, ‘सायंकाळी ६.३० नंतर मंडळ मिरवणुकीत सहभागी होईल. दरवर्षीप्रमाणे यंदाही आमच्या मंडळा मागे हुतात्मा बाबू गेनू गणपती, भाऊ रंगारी गणपती आणि त्यापाठोपाठ अखिल मंडई मंडळ विसर्जन मिरवणुकीत सहभागी होईल. समस्त भाविकांच्या भावना विचारात घेऊन सर्व मंडळांकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच पोलिसांना सहकार्य करून शिस्त पाळून मिरवणूक लवकर संपविण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू’.

हुतात्मा बाबू गेनू गणपती मंडळाच्या बाळासाहेब मारणे यांनी सांगितले की, ‘हुतात्मा बाबू गेनू गणपती मंडळाची सजावट आणि विसर्जन रथ हे विसर्जन मिरवणुकीचे मुख्य आकर्षण असते. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यंदाही आपले मंडळ सायंकाळी मिरवणुकीत सहभागी होईल. उत्सव मंडपापासून सायंकाळी ६.४५ वाजता आरती करून मंडळ विसर्जनासाठी मार्गस्थ होणार आहे. तर श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचे उत्सव प्रमुख पुनीत बालन यांनी म्हटले, ‘विसर्जन मिरवणुकीसाठी सायंकाळी सहभागी होणाऱ्या प्रमुख मंडळांनी केलेली सजावट आणि विद्युत रोषणाई हे सायंकाळ नंतरचे मुख्य आकर्षण असते. जे पहायला ठिकठिकाणाहून लाखो भाविक येतात. अशा भाविकांच्या भावनांचा विचार करून आम्ही ठरलेल्या वेळेतच सायंकाळी मिरवणुकीत सहभागी होणार आहोत. तसेच सर्व प्रकारची शिस्त पाळत विसर्जन मिरवणूक पार पाडली जाईल’.

अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात यांनी मिरवणुकीच्या नियोजनाबद्दल सांगितले की, ‘पोलीस आणि प्रशासनाला सहकार्य करून शिस्तबद्ध पद्धतीने लवकरात लवकर विसर्जन मिरवणूक संपविण्याचा सर्व मंडळांचा प्रयत्न राहील. दरवर्षीच्या नियोजित वेळेपेक्षा आधी निघणे मंडळांना शक्य होत नाही. मानाच्या गणपती मंडळांच्या मिरवणुकीनंतरचं इतर गणपती मंडळे लक्ष्मी रोडने मिरवणुकीमध्ये मार्गस्थ होतात. त्यामुळे यंदाही मानाची मंडळे पुढे जाईपर्यंत इतर मंडळांना विसर्जन मिरवणुकीसाठी मार्गस्थ होता येणार नाही. म्हणूनच आम्ही नेहमीच्या वेळेत विसर्जनासाठी निघणार आहोत’. दरम्यान श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाच्या मिरवणुक नियोजनाबद्दल बोलताना अण्णा म्हणाले, ‘त्या मंडळाने दुपारी ४ वा. मिरवणुक काढण्याचा घेतलेला निर्णय हा त्यांचा वैयक्तिक आहे. ज्याला आमची हरकत नाही. मात्र, आम्हाला त्यांच्या सोबत चार वाजता निघणे प्रॅक्टिकली शक्य नाही. अन्य मंडळे आणि आमचे कार्यकर्ते यांच्याशी चर्चा करून आम्ही दरवर्षी प्रमाणेच मिरवणुकीत सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे’