2 वर्षात 3 पोटनिवडणूका लढवल्या, तेव्हा भाजपला संस्कृती दिसली नाही का?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीतून भाजपने आपल्या उमेदवाराचा अर्ज मागे घेत ही महाराष्ट्राची संस्कृती आहे असं म्हंटल. परंतु महाविकास आघाडीचे सरकार असताना मागील २ वर्षात ३ ठिकाणी पोटनिवडणूक पार पडल्या तेव्हा मात्र भाजपने सर्व ठिकाणी आपले उमेदवार उभे केले होते. त्यावेळी भाजपला आपली संस्कृती आठवली नाही का असा प्रश्न निर्माण होतो.

यापूर्वी पंढरपूर, देगलूर आणि कोल्हापूर उत्तर या ३ मतदारसंघात पोटनिवडनुक लागली होती. त्यावेळी या तिन्ही ठिकाणी भाजपने आपले उमेदवार उभे केले होते. त्यामध्ये पंढरपूर पोटनिवडणुकीत भाजपचा विजय झाला तर इतर २ ठिकाणी मात्र त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता.

राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर पंढरपूर पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीने त्यांचेच सुपुत्र भगीरथ भालके याना उमेदवारी दिली. मात्र भाजपने त्यावेळी समाधान अवताडे यांना उमेदवारी दिली होती. येव्हडच नव्हे तर अवताडे यांच्या प्रचारासाठी संपूर्ण भाजप रस्त्यावर उतरली होती. या निवडणुकीत भाजपने भगीरथ भालके यांचा पराभव केला.

दुसरी पोटनिवडणूक लागली नांदेड येथील देगलूर विधानसभा मतदारसंघात… यावेळी काँग्रेस आमदार रावसाहेब अंतापूरकर यांच्या निधनानंतर त्यांचे सुपुत्र जितेश अंतापूरकर याना काँग्रेसने उमेदवारी दिली होती. मात्र भाजपने त्यावेळी शिवसेनेतील नाराज उमेदवार सुभाष साबणे याना पक्षात प्रवेश देऊ थेट उमेदवारीही दिली. काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी अंतापूरकर यांचा जोरदार प्रचार केला आणि त्यांना विजयी सुद्धा केलं.

यांनतर तिसरी पोटनिवडणूक लागली ती कोल्हापूर उत्तरला… काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनानंतर इथे पोटनिवडणूक लागली होती. खरं तर या मतदारसंघात काँग्रेस आणि शिवसेनेत मुख्य लढत व्हायची परंतु महाविकास आघाडीमुळे शिवसेनेने ही जागा काँग्रेसला सोडली. काँग्रेसने याठिकाणी चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव याना उमेदवारी दिली. मात्र भाजपने इथेही आपला उमेदवार उभा केला होता. स्वतः देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या सर्वच नेत्यांनी ही निवडणूक प्रतिष्टेची केली होती मात्र यावेळीही भाजपच्या नशिबी पराभवच आला आणि जयश्री जाधव आमदार झाल्या.

आताही अंधेरी पोटनिवडणुकीसाठी दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके निवडणुकीसाठी उभ्या राहिलेल्या असतानाही भाजपने मुरजी पटेल यांच्या रूपाने आपला उमेदवार दिला होता. मोठं शक्तिप्रदर्शन करत त्यांनी उमेदवारी अर्जही भरला होता. मात्र अखेरच्या क्षणी भाजपने उमेदवारी मागे घेत पोटनिवडणुकीत उमेदवार द्यायचं नाही ही महाराष्ट्राची संस्कृती आहे असं म्हंटल आहे. मग मागील ३ पोटनिवडणुकीत भाजपने का उमेदवार दिला? तेव्हा भाजपला महाराष्ट्राची संस्कृती दिसली नाही का असा प्रश्न उपस्थित होतो.