हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपण राजकारणात निवृत्ती घेतोय अशी घोषणा करून सर्वानाच मोठा धक्का दिला. पवारांनी हा निर्णय मागे घ्यावा म्हणून पक्षातील जेष्ठ नेत्यांनी वारंवार विनंती केली. जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड यांना तर अक्षरशः अश्रू अनावर झाले. नेते आणि कार्यकर्त्यांनी मनधरणी करूनही पवार आपल्या निर्णयावर अजूनही ठाम आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचा नवा अध्यक्ष कोण? या चर्चा जोर धरू लागल्या आहेत. यामध्ये खासदार सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांची नाव आघाडीवर आहेत.
सुप्रिया सुळे आणि प्रफुल पटेल राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय राजकारणात कार्यरत आहेत. प्रफुल्ल पटेल हे शरद पवारांचे अत्यंत विश्वासू मानले जातात. संपूर्ण देशभरात शरद पवार दौरे करतात तेव्हा प्रफुल्ल पटेल हे सावलीसारखे त्यांच्या सोबत असताना आपण बघितलं आहे. तर दुसरीकडे सुप्रिया सुळे या शरद पवार यांच्या कन्या आहेत. अनेक वर्ष त्या खासदार असल्याने दिल्लीच्या राजकारणाची त्यांना संपूर्ण जाण आहे. त्यामुळे जर शरद पवार आपल्या निर्णयावर ठाम राहिले तर या दोघांपैकी कोणाची तरी वर्णी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी लागू शकते अशा चर्चा सुरु आहेत.
दरम्यान , मी माझा महाराष्ट्र सोडणार नाही, मी सहा महिने दिल्लीला जाऊन बघितलं, पण मला दिल्ली मानवली नाही. मला आपला महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातील जनता पटते,असं विधान काही दिवसांपूर्वी अजित पवार यांनी केलं होते. त्यामुळे राष्ट्रीय राजकारणात सक्रिय असलेल्या सुप्रिया सुळे यांची दावेदारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी भक्कम मानली जात आहे. तसेच सुप्रिया सुळे या शांत स्वभावाच्या आणि मनमेळावू आहेत. दिल्लीच्या राजकारणावर त्यांचा प्रभाव आहे ही त्यांची जमेची बाजू मानली जातेय. महत्त्वाचे म्हणजे सुप्रिया सुळे आज कर्नाटकातील निपाणी येथे प्रचाराला जात आहे. त्यामुळे त्यांच्याकडेच पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.