“….हे लहान पोरांसारखं माझं चॉकलेट तू का काढून घेतलंस”; आव्हाडांचा भाजपाला सणसणीत टोला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

 हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन :  कोरोनाने राज्यात हाहाकार उडविलेला असताना शनिवारी रात्रीपासून राज्यात रेमडेसिविर इंजेक्शनच्या निमित्ताने सत्ताधारी महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये जोरदार शाब्दिक युद्ध सुरू झाले आहे. सत्ताधारी पुरवठादारांवर दबाव टाकत असल्याचा आरोप भाजपाने केला आहे. तर, भाजपा नेते पोलिसांवर दबाव टाकून साठेबाजांना वाचविण्याचा प्रयत्न करत असल्याचा प्रत्यारोप महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला आहे. याच दरम्यान राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी भाजपा नेत्यांना सणसणीत टोला लगावला आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. “….हे लहान पोरांसारखं माझं चॉकलेट तू का काढून घेतलंस” असं म्हणत भाजपावर निशाणा साधला आहे. तसेच एकत्रित येऊन काम करण्याचं आवाहन देखील केलं आहे. “ब्रूक्स फार्मा या कंपनीचे साठेबाजी करणे आणि औषधे काळ्या बाजारात विकणे त्यांचा धंदा जोरात आहे. गुजरात मध्येच त्यांच्यावर केस झाली आहे. महाराष्ट्राला आता सगळ्या राजकारण्यांनी एक व्हावं याची गरज आहे. हे लहान पोरांसारखं माझं चॉकलेट तू का काढून घेतलंस. रागाच्या भरात चूक झाली असेल…” असं आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

मुंबई पोलिसांनी शनिवारी रात्री ब्रुक फार्मा कंपनीच्या राजेश डोकानिया यांना चौकशीसाठी ताब्यात घेतल्यापासून या वादाला सुरुवात झाली. दमण येथील या कंपनीने महाराष्ट्रासाठी भाजपाला 50 हजार रेमडेसिवीर देण्याचे कबूल केले होते. या कंपनीच्या मालकाला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती मिळताच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, पराग अळवणी आदी नेत्यांनी मध्यरात्री पोलिस स्थानकात धाव घेतली. यावेळी फडणवीस यांनी पोलिसांना धारेवर धरत अशाप्रकारे अटकेची कारवाई करता येणार नाही, असे सांगितले.

Leave a Comment