हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी इतके दिवस नॉट रिचेबल असलेले मंत्री संजय राठोड आज अचानक प्रकट झाले. राज्याच्या एका मंत्र्यावर गंभीर आरोप आहेत. त्यासंबंधीचे अनेक पुरावे देखील समोर आले आहेत. तरीसुद्धा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काहीच बोलत नाहीत.याचा अर्थ पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची संजय राठोड यांना मूकसंमती आहे का ? असा सवाल भाजप नेते आमदार आशिष शेलार यांनी उपस्थित केला आहे. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
शेलार पुढे म्हणाले की “एका गंभीर प्रकरणात आरोपी असणारे अदृश्य मंत्री आज पंधरा दिवसांनंतर दृश्य झाले. त्यामुळे आतापर्यंत अदृश्य स्वरुपात असलेली कारवाई केव्हा दृश्य होणार? आता अदृश्य कारभार, केव्हा दृश्य होणार? अशी खोचक टीका देखील त्यांनी केली.
दरम्यान, पूजा चव्हाण प्रकरणावर शिवसेना नेते आणि वनमंत्री संजय राठोड यांनी आज पहिल्यांदाच आपली दिली. पोहरादेवी या गोर बंजारा समाजाच्या काशी मानल्या जाणाऱ्या धार्मिक क्षेत्रावर जाऊन त्यांनी आधी दर्शन घेतलं. यावेळी त्यांच्या हजारो समर्थकांनी याठिकाणी गर्दी केली होती. यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी आपल्या आरोपासंदर्भात मौन सोडलं. त्यात त्यांनी म्हटलं की मी ” आपल्या सर्वांना मी विश्वासानं सांगू शकतो, की याची चौकशी माननीय मुख्यमंत्र्यांनी लावलेली आहे, या चौकशीद्वारे पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. तपासातून साऱ्या गोष्टी स्पष्ट होती.”
“मात्र गेल्या १० दिवसांपासून माझ्याबद्दल जे घाणेरडं राजकारण करण्याचा प्रयत्न झाला आहे. मी आपल्या सर्वांना विनंती करणार आहे, माझी, माझ्या कुटुंबाची तसेच माझ्या समाजाची कृपा करुन बदनामी करु नका. तसेच मी गेल्या १० दिवसांपासून आपल्या सर्वांचं प्रेम पाहात होतो. माझ्या पत्नीला ब्लड प्रेशरचा त्रास आहे. आई-वडिलांना तसेच पत्नीला सांभाळण्याचं काम मी या दिवसांमध्ये करत होतो तसेच सरकारी कामं करत होतो. मी कुठंही गेलेलो नव्हतो. आता मला या प्रकरणावर काही बोलायचं नाही. मी एवढंच सांगू इच्छितो की चौकशीत सगळं बाहेर येईल.” असं राठोड या पत्रकार परिषदेत म्हणाले.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.