Saturday, March 25, 2023

नितीश कुमार भाजपसोबत काडीमोड घेणार; भाजपला ‘ती’ फोडाफोडी महागात पडण्याची शक्यता

- Advertisement -

पाटणा । नव्या वर्षात बिहारमध्ये मोठ्या राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता आहे. त्याचे संकेत राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांच्या पत्नी आणि माजी मुख्यमंत्री राबडीदेवी यांनी दिले आहेत. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पुन्हा महागठबंधनमध्ये सामील करून घेण्याबद्दल पक्षाचे नेते विचार करतील, असं राबडीदेवी म्हणाल्या होत्या. अरुणाचल प्रदेशात भारतीय जनता पक्षानं नितीश कुमार यांच्या संयुक्त जनता दलाचे (JDU) सातपैकी 6 आमदार फोडले. बिहारमध्ये (Bihar) मित्रपक्ष असलेल्या भाजपनं (BJP) दिलेला धक्का नितीश यांच्या जिव्हारी लागला आहे. त्यानंतर राजदनं नितीश यांना पुन्हा महागठबंधनमध्ये आणण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.

भारतीय जनता पक्ष बिहारमध्ये अरुणाचल प्रदेशची पुनरावृत्ती करू शकतो, असं राबडीदेवी म्हणाल्या. जेडीयूला सोबत घेऊन राज्यात सत्तांतर घडवण्याचा राजदचा प्रयत्न आहे. त्यासाठी खुद्द लालू प्रसाद यादव कामाला लागले आहेत. नितीश कुमार यांना लक्ष्य करू नका, अशा सूचना त्यांनी पक्षाच्या नेत्यांना केल्या आहेत. अरुणाचल प्रदेशमध्ये भाजपनं केलेलं राजकारण नितीश यांना पटलेलं नाही.

- Advertisement -

नितीश कुमार यांना महागठबंधनमध्ये आणण्यासाठी काँग्रेसप्रणित संयुक्त पुरोगामी आघाडीमधील (UPA) काही नेतेदेखील कामाला लागल्याची चर्चा आहे. यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचीही मदत घेतली जाण्याची शक्यता आहे. अरुणाचल प्रदेशमध्ये भाजपनं केलेलं फोडाफोडीचं राजकारण ही राजदसाठी संधी आहे आणि नितीश यांच्यावर टीका करून ती गमावू नका, असा सल्ला लालूंनी त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना दिला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’