निवडणुका हरले तर मोदी-शाह राजीनामा देणार का? : काँग्रेसच्या ‘या’ नेत्याचा सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन : पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकांमुळे वातावरण ढवळून निघालं आहे. मतदानाचे चार टप्पे पार पडले असून आठ टप्प्यात होणाऱ्या या निवडणुकीची जवळपास निम्मी प्रक्रिया आता पूर्ण झाली आहे. पाचव्या टप्प्यातील मतदानाआधी इथे निवडणूक प्रचार सुरू असून तृणमूल काँग्रेसला सत्तेतून हद्दपार करण्यासाठी भाजपाने आपली पूर्ण ताकद प्रचारासाठी लावली आहे. ​एकेकाळी भाजपाच्या कोअर ग्रुपमध्ये गणले जाणारे आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते राहिलेले व अलिकडेच तृणमूल काँग्रेसमध्ये दाखल झालेले यशवंत सिन्हा यांनी नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यावर निशाणा साधला आहे.

“बंगालच्या निवडणुका हरल्यास पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्री आपल्या पदाचा राजीनामा देणार का?”, असा प्रश्न यशवंत सिन्हा यांनी विचारलाय. “या निवडणुकीत ते स्वतः ज्याप्रकारे प्रचारात उतरलेत…त्यानंतरही जर पराभव झाला तर स्वाभिमान राखून त्यांनी किमान राजीनामा द्यायला हवा…पण प्रतिष्ठा नसलेल्या लोकांकडून मी जरा जास्तच अपेक्षा ठेवतोय हे मला माहित आहे”, अशा आशयाचं ट्विट सिन्हा यांनी केलं आहे. एकेकाळी भाजपाच्या थिंक टँकमध्ये यशवंत सिन्हा यांचा समावेश होता. मात्र, पक्षासोबत झालेल्या पराकोटीच्या मतभेदांमुळे यशवंत सिन्हा यांनी २०१८मध्ये भाजपाला रामराम ठोकला. त्यावेळी देशातली लोकशाही धोक्यात आली आहे, असं त्यांनी केलेलं विधान बरंच गाजलं होतं. नंतर वयाच्या ८३व्या वर्षी पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकांच्या ऐन महिनाभर आधी त्यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

दरम्यान, बंगालमधून तृणमूल काँग्रेसला सत्तेतून हद्दपार करण्यासाठी भाजपाने आपली पूर्ण ताकद प्रचारासाठी लावली आहे. भाजपाने प्रतिष्ठा पणाला लावलेल्या आणि सत्ताधारी तृणमूल काँग्रेसने अस्तित्वाची लढाई केलेल्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत शनिवारी चौथ्या टप्प्यातील मतदान सुरू असताना हिंसाचाराचा उद्रेक झाला. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या गोळीबारात चार, तर गोळीबाराच्या दुसऱ्या घटनेत एक मतदार ठार झाला. गोळीबाराच्या घटनेमुळे सितलकुची भागातील १२६ क्रमांकाच्या मतदान केंद्रावरील मतदान प्रक्रिया रद्द करून तेथे फेरमतदान घेण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने जाहीर केला. तर, कुचबिहारमध्ये जाण्यासाठी सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांना पुढील ७२ तास बंदी असेल, असे केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे. त्याचप्रमाणे तेथे केंद्रीय सशस्त्र पोलिसांच्या जादा ७१ तुकडय़ा पाठविण्याचा आदेशही आयोगाने केंद्रीय गृह विभागाला दिला आहे. पश्चिम बंगाल विधानसभेच्या चौथ्या टप्प्यात ४४ जागांसाठी शनिवारी मतदान झाले. याही टप्प्यात मतदारांनी उत्साहाने मतदान केले. संध्याकाळी ५ वाजेपर्यंत एक कोटी १५ लाख मतदारांपैकी ७६.१६ टक्के नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला

You might also like