पोलिसांवर दबाव खपवून घेणार नाही; दिलीप वळसे पाटलांचा फडणवीसांना इशारा !

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : मुंबई पोलिसांनी ब्रुक फार्माच्या मालकाला ताब्यात घेतल्याची माहिती मिळताच देवेंद्र फडणवीस विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांच्यासोबत काल रात्री पोलीस ठाण्यात पोहोचले होते. यावेळी त्यांनी कारवाईवरुन पोलिसांना जाब देखील विचारला. एवढच नाहीतर यादरम्यान भाजपा नेते आणि पोलिसांमध्येही शाब्दिक वाद झाले व यानंतर सर्वजण बीकेसीमधील पोलीस आयुक्तालयात पोहोचले असता तेथील चर्चेनंतर अधिकाऱ्याला सोडण्यात आलं. या सर्व घडामोडीमोडींच्या पार्श्वभूमीवर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना, पोलिसांवर दबाव टाकणं योग्य नाही, या पुढील काळात अशा गोष्टी सहन केल्या जाणार नाहीत. असा विरोधी पक्षनेत्यांना इशारा दिला.

गृहमंत्री वळसे पाटील म्हणाले, “पोलिसांना माहिती मिळाली की मुंबईत जवळपास ५० हजार रेमडेसिवीर येत आहेत. त्या संदर्भात चौकशी करण्यासाठी ब्रुक्स फार्मा या कंपनीच्या संचालकांना पोलिसांनी काल पोलीस स्टेशनमध्ये बोलावलं असता, त्या ठिकाणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर व त्यांचे अन्य सहाकारी त्या ठिकाणी पोहचले. यानंतर त्यांनी प्रश्न उपस्थित केला की या व्यक्तीला या ठिकाणी का व कशासाठी बोलावलं गेलं आहे. जर एखाद्या प्रकरणात पोलिसांना चौकशी करावीशी वाटली तर पोलिस कोणालाही बोलावू शकतात, त्या दृष्टीने त्यांना बोलावण्यात आले होते. या ठिकाणी पोलिसांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला गेला. एकप्रकारे शासकीय कामात हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मी या निमित्त एवढंच सांगू इच्छितो अशाप्रकार पोलिसांवर दबाव टाकणं हे योग्य नाही. या दृष्टीकोनातून या पुढील काळात अशा गोष्टी सहन केल्या जाणार नाहीत.”

“या प्रकरणी कारवाई संदर्भात मी आमच्या सर्व सहकाऱ्यांशी चर्चा करतो आहे आणि योग्य तो निर्णय घेतला जाईल. हा जो साठा आहे तो नेमका कुठे जाणार होता? कोणाला दिला जाणार होता? सरकारला दिला जाणार होता की एखाद्या राजकीय पक्षाला दिला जाणार होता. या संदर्भात मुंबई पोलिसांना संपूर्ण चौकशी करण्यास सांगितले आहे. अशी देखील माहिती आहे की केवळ एवढाच साठा नसून यापेक्षाही अधिक असण्याची शक्यता आहे.” अशी देखील यावेळी गृहमंत्र्यांनी माहिती दिली.

फडणवीस यांनी दबाव टाकल्याने ब्रुकच्या मालकाला सोडण्यात आलेलं नाही. तर त्याने परवानगीचं पत्रं दाखवल्याने सोडण्यात आलं आहे. त्याला चौकशीसाठी पुन्हा बोलावू असं पोलिसांनी सांगितलं आहे, अशी माहिती त्यांनी दिली. कुणा मंत्र्याचंया ओएसडीने धमकी दिल्याचं मला माहीत नाही, असंही ते म्हणाले.

Leave a Comment