केंद्राकडे बोट दाखवून ठाकरे सरकार स्वतःचं अपयश लपवू शकत नाही; रामदास आठवलेंचा टोला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : राज्य सरकार केंद्रावर खोटे आणि खोडसाळ आरोप करीत आहे. रेमडेसिव्हीरसह सर्व औषधे महाराष्ट्राला मिळतील. औषधे पुरवू नका असे कोणतेही सरकार आदेश देऊ शकत नाही. महाविकास आघाडी सरकार केंद्राकडे बोट दाखवून आपले अपयश लपवू शकत नाही, असा टोला केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी राज्य सरकारला लगावला आहे. कोरोनाचा कहर रोखण्याची जबाबदारी राज्य सरकारचीसुद्धा आहे. त्यामुळे या परिस्थितीत आरोपांचे राजकारण कोणी करू नये, असे आवाहनही रामदास आठवले यांनी आज मुंबईत केले.

कोरोना या साधीच्या रोगामुळे मोठया प्रमाणात मृत्यू होत आहेत, त्यास पंतप्रधान मोदी जबाबदार असल्याचा खोटा खोडसाळ आरोप राज्य सरकार करीत आहे. देशात कोरोनाचा कहर रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी चांगले काम करीत आहेत. सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी; राज्यपालांशी संवाद साधत आहेत. महराष्ट्राच्या महाविकास आघाडी सरकारने दुतोंडी भूमिका घेऊ नये. केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला लस, ऑक्सिजन; रेमडेसिव्हीरसह सर्व औषधांचा पुरवठा करण्यात येत आहे. राज्य सरकारने कोरोनाच्या मुद्द्यावर राजकारण करू नये आणि खोटे खोडसाळ आरोप केंद्र सरकारवर करू नये, असे आवाहन रामदास आठवले यांनी केले आहे.

आठवले म्हणाले की, मला रोज मुंबईसह राज्यातून फोन येत आहेत की रुग्णांना बेड मिळत नाहीत. रुग्णांची गैरसोय होत आहे. कोरोनाच्या काळात रुग्णांना सुविधा पुरविण्यात मुंबई मनपा आणि राज्य सरकार अपयशी ठरले आहे. मात्र राज्य सरकार केंद्राकडे बोट दाखवून आपले अपयश लपविण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहे, असा आरोप रामदास आठवले यांनी केला.

Leave a Comment