हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मु्स्लिम समाजाला शिक्षणात आरक्षण देण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीने शिवसेनेवर दबाव आणल्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भाजप साथ देईल, असं जाहीर वक्तव्य भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केलं आहे.
आज माध्यमांशी बोलतांना सुधीर मुनगंटीवार यांनी मुस्लिम आरक्षणाला विरोध दर्शविला. धर्माच्या आधारावर दिल्या जाणाऱ्या आरक्षणाला भाजपचा विरोध आहे. संविधानात धर्माच्या आधारावर आरक्षण देण्याची तरतूदच नाही. जर मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण मिळत असेल तर ख्रिश्चन आणि शिखांनी तरी काय गुन्हा केला? त्यांनाही धर्माच्या आधारे आरक्षण का दिलं जात नाही? असा सवाल उपस्थित करत मुस्लिम आरक्षणाच्या मुद्दयावरून शिवसेनेने दोन्ही काँग्रेसची साथ सोडल्यास आम्ही शिवसेनेला साथ देऊ, असं सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं. केंद्राने आर्थिक दुर्बलांसाठी १० टक्के आरक्षण दिलं आहे. त्यात मुस्लिम, शीख आणि ख्रिश्चनांचाही समावेश असल्याचं त्यांनी सांगितलं.
गेल्या शक्रवारी राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी मुस्लिम समाजाला शिक्षण क्षेत्रात ५ टक्के आरक्षण देणार असल्याची घोषणा केली होती. त्यामुळे शिवसेनेवर भाजपने टीका केली होती. त्यावर मुस्लिमांना शिक्षणात आरक्षण देण्याचा कुठलाही प्रस्ताव सरकार समोर आला नसल्यानं विरोधकांनी कुठलीही आदळआपट करू नये असं विधान करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. मात्र, मुस्लिम आरक्षणाच्या मुद्द्यावरून शिवसेनेची दोन्ही काँग्रेसने कोंडी केलेली असतानाच भाजपने शिवसेनेबरोबर युतीचे संकेत दिल्याने तर्क-वितर्क व्यक्त केले जात आहेत. सत्तेपासून दूर राहिलेल्या भाजपकडून वारंवार शिवसेनेला महाविकास आघाडीतून बाहेर पडल्यास पुन्हा युतीचे सरकार स्थापन करण्याची ऑफर आता संकेतातून दिली जात आहे.
दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.