सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे
चोरटी वाळूतस्करी केली म्हणून ताब्यात घेतलेला वाळूचा ट्रक तहसील कार्यालयातून जबरदस्तीने पळवून नेण्याच्या प्रयत्नात असलेला वाळू चोरट्याला येथील तहसीलदार कल्पना ढवळे यांनी वाटेत अडवून चांगलाच चोप दिला. चित्रपटाला शोभेल असा थरारक प्रकार तासगावात सायंकाळी पाचच्या सुमारास घडला. तर याठिकाणी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.
मणेराजुरी येथील मंडल अधिकाऱ्यांनी सकाळी शिरोळ तालुक्यातील अजित शिवाजी जाधव याचा ट्रक बेकायदा वाळूचोरी करीत असताना ताब्यात घेतला होता. हा ट्रक तहसील कार्यालय येथे जप्त करुन आणून लावण्यात आला होता. दरम्यान मिटींगनिमित्त तहसीलदार ढवळे या दिवसभर मिरज प्रांतकार्यालयामध्ये होत्या. मिटींग आवरुन तासगावमध्ये त्या आल्यानंतर कार्यालयाकडे वळण घेत असताना समोरुन वरील क्रमांकाचा ट्रक येत असल्याचे दिसून आले. तहसीलदार ढवळे यांनी क्षणार्धात हा ट्रक सकाळी कारवाई करण्यात आलेला असल्याचे ओळखले. आपण परवानगी दिली नसताना हा ट्रक तहसील कार्यालय आवारातून बाहेर जात असल्याचे पाहून त्यांना शंका आली. त्यांनी त्वरीत ट्रकचा पाठलाग केला. दरम्यान यावेळी ट्रकचा मालक जाधव हा दुसर्या कारमध्ये होता. तो तहसीलदारांना अडवण्याचा प्रयत्न करत होता. यातूनही तहसीलदार ढवळे यांच्या चालकाने शिताफीने त्यांचे वाहन ट्रकसमोर नेवून ट्रक अडवला. कसलाही विचार न करता स्वतः तहसीलदार ढवळे यांनी ट्रकचालकाला ट्रकमधून खाली ओढून चोप देण्यास सुरूवात केली. यावेळी बघ्यांची गर्दी झाली होती. तर यावेळी अजित जाधव याच्यासह त्याची कारही पोलिसांनी त्वरीत घटनास्थळी येवून ताब्यात घेतली. तहसीलदार ढवळे यांनी दाखवलेल्या या धाडसाबद्दल त्यांचे कौतूक होत आहे.