नवीन जलवाहिनीचे काम नव्या वर्षात होणार सुरू

औरंगाबाद – शहरवासीयांची तहान भागवण्यासाठी शासनाने 1680 कोटी रुपयांची नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर करून वर्षभर हून अधिक कालावधी उलटला आहे. परंतु, आता नव्या वर्षात जानेवारी जायकवाडी ते नक्षत्रवाडी या दरम्यान पाणीपुरवठा योजनेसाठी जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू होण्याची शक्यता आहे. हे अंतर 39 किमी असून प्रत्येक महिन्यात जास्तीत जास्त दीड किलो मीटर जलवाहिनी टाकण्याचे काम होईल, असे जीपीचे अधीक्षक अभियंता अजय सिंह यांनी सांगितले.

जायकवाडी ते नक्षत्रवाडी या दरम्यान 25 सेमी व्यासाची मुख्य जलवाहिनी टाकण्यात येणार आहे. नक्षत्रवाडी डोंगराच्या पायथ्याशी जलशुद्धीकरण केंद्राचे काम सुरू करण्यात आले आहे. जलशुद्धीकरण केंद्रापासून थोड्याच अंतरावर पाईप निर्मितीसाठी फॅक्टरी उभारण्याचे काम सुरू आहे.

हे काम जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यानंतर पाईप निर्मिती आणि 39 किलो मीटर पाइपलाइनच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल.