हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलचा (WTC Final) आज शेवटचा दिवस असून भारतीय संघाला विजयासाठी 280 धावांची गरज आहे. भारताची सगळी मदार विराट कोहली आणि मुंबईकर अजिंक्य रहाणे या दोघांवर आहे. सध्या भारताची धावसंख्या 3 बाद 164 असून विराट कोहली 44 तर अजिंक्य रहाणे 20 धावांवर खेळत आहे.
ओव्हल मैदानावर सुरु असलेल्या या सामन्यात सर्वप्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 469 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताचा पहिला डाव अवघ्या 296 धावांवर आटोपला. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात आठ विकेट्सवर 270 धावा करून डाव घोषित केला. त्यामुळे भारतीय संघासमोर विजयासाठी 444 धावांचे लक्ष्य होते. हे लक्ष्य गाठताना भारताने चांगली सुरुवात केली होती. कर्णधार रोहित शर्माने आक्रमक पवित्रा घेत 60 चेंडूत 43 धावा ठोकल्या. मात्र चेतेश्वर पुजारा आणि शुभमन गिल पुन्हा एकदा अपयशी ठरले. गिल 18 आणि पुजारा 27 धावांवर तंबूत परतले.
पण त्यानंतर विराट कोहली आणि अजिंक्य रहाणेनं अतिशय धैर्याने फलंदाजी करत आणखी पडझड होऊन दिली नाही. चौथ्या दिवसाचा खेळ संपला त्यावेळी भारतने 40 षटकांमध्ये 3 विकेट्स गमावत 164 धावा केल्या. आज सामन्याच्या अखेरच्या दिवशी भारतीय संघाला विजयासाठी आणखी 280 धावांची गरज आहे. भारतीय फलंदाजीबद्दल सांगायचं झाल्यास, सध्या विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे मैदानात आहेत. त्यानंतर रवींद्र जडेजा, केएस भरत आणि आणि शार्दूल ठाकूर हे सुद्धा उपयुक्त फलंदाजी करू शकतात. त्यामुळे टीम इंडिया आज 280 धावा काढून ऐतिहासिक विजय मिळवू शकते का याकडे संपूर्ण क्रिकेट चाहत्यांचे लक्ष्य लागलं आहे.