हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना नेते आणि मुंबई महापालिका स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांना आयकर विभागाने दणका दिला आहे. यशवंत जाधव यांच्याशी संबंधित 41 मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत. यात भायखळ्यातील 31 फ्लॅट्स आणि वांद्रेतील 5 कोटींचा फ्लॅट आयकर खात्याकडून जप्त करण्यात आला आहे.
काही दिवसांपूर्वीच यशवंत जाधव यांच्या घरी आणि मालमत्तांवर छापे टाकले होते. या छाप्यात त्यांनी मिळालेल्या माहितीनंतर आता थेट जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. त्यानुसार जाधव, त्यांचे कुटुंबीय आणि सहकारी यांच्या 41 मालमत्तांवर आयकर विभागानं टाच आणली आहे. त्यात भायखळ्यातील एकाच इमारतीमधील 31 फ्लॅट्सचा समावेश आहे. याशिवाय याच भागातील एम्पिरियल क्राऊन हॉटेलवरही जप्तीची कारवाई करण्यात आली आहे.
तत्पूर्वी यशवंत जाधव यांच्या डायरीत आणखी 2 नेत्यांची नावे समोर आली आहेत. केबलमॅन आणि एम ताई अशी ती 2 नावे आहेत. यातील केबलमॅन या व्यक्तीला एक कोटी 25 लाख दिल्याचा उल्लेख केला आहे तर एम ताई या व्यक्तीला 50 लाख रुपये दिल्याचा उल्लेख आहे. दरम्यान, हे केबलमॅन आणि M-TAI असा उल्लेख असणारे व्यक्ती कोण याबद्दल अद्याप समजू शकले नाही. मात्र, या नावावरून वेगवेगळे तर्क वितर्क लढवले जात आहेत.