हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राजस्थानच्या उदयपूर जिल्ह्यातील झाडोल विधानसभा मतदारसंघाचे आमदार बाबूलाल खराडी यांनी नागरिकांना एक अजब सल्ला दिला आहे. “तुम्ही खूप मुले जन्माला घाला. चिंता करण्याची गरज नाही, पंतप्रधान नरेंद्र मोदी घर देतील, स्वस्तात गॅस मिळेल” असे बाबूलाल खराडी यांनी म्हटले आहे. त्यांनी दिलेल्या या सल्ल्यामुळे राजकिय वर्तुळात त्यांच्यावर जोरदार टीका करण्यात येत आहे.
मंगळवारी विकसित भारत संकल्पयात्रेत सहभागी झालेल्या बाबूलाल खराडी यांनी नागरिकांशी संवाद साधला. यावेळी बोलतानाच, “तुम्ही खूप मुलं जन्माला घाला. पंतप्रधान मोदी घर देतील. कोणीही घराशिवाय राहू नये, असे पंतप्रधानांचे स्वप्न आहे. मग त्रासच होणार नाही. तुम्हाला माहिती आहे की, पंतप्रधान देशाला पुढे नेऊ इच्छितात” असे बाबूलाल खराडी यांनी सर्वांना सांगितले. त्यांच्या या वक्तव्यावर नागरिकांनी देखील जोरदार टाळ्या वाजविल्या.
सध्या बाबूलाल खराडी यांनी केलेल्या वक्तव्याची क्लिप सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यामुळे त्यांच्यावर जोरदार टीका करण्यात येत आहे. मुख्य म्हणजे, खराडी हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते आहेत. यापूर्वी ते 2003 आणि 2008 मध्ये निवडणूक जिंकून आले होते. मात्र 2013 साली त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. परंतु पुन्हा ते सलग दोन वेळा आमदार झाले. आता बाबूलाल खराडी हे मोदी सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री आहेत.