व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

दहिसरमध्ये तडीपार गुंडाची भरदिवसा तरुणाला मारहाण

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – मुंबईमधील दहिसरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये शुक्रवारी संध्याकाळी एका तडीपार तरुणाने आपल्या काही गुंडांसोबत मिळून परिसरात मोठ्या प्रमाणात राडा घातला आहे. दहिसर पूर्व मधील वीर संभाजी नगर या भागात हा सगळा प्रकार घडला आहे. आरोपी तरुणाला दहिसर पोलीस स्टेशन परिसरातून तडीपार करण्यात आले आहे.

काय आहे नेमके प्रकरण?
आरोपी तरुण हा दहिसर या ठिकाणी असलेल्या संजय सिंह नावाच्या व्यक्तीच्या घरी आपल्या काही गुंडांसोबत जबरदस्तीनं घुसला. तो एवढ्यावरच थांबला नाहीतर त्याने संजय सिंह याला मारहाण केली तसेच त्या ठिकाणी राहणाऱ्या एका तरुणाच्या पोटात धारदार शस्त्राने वार केले. यानंतर या तरुणाला तातडीने उपचारासाठी दहिसर येथील खासगी रुग्णालयात नेण्यात आले. या तरुणाची तब्येत अधिक गंभीर असल्यामुळे त्याला नायर रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

या मारहाणीप्रकरणी दहिसर पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपासाला सुरुवात केली आहे. या मारहाणीची संपूर्ण घटना त्या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. यामध्ये काही गुंड घराची तोडफोड करताना आणि मारहाण करताना दिसत आहेत. काल सगळ्यांना मकर संक्रांतीची सुट्टी होती. यादरम्यान काही लोकांनी नशेमध्ये मारहाण केली. या मारहाणीत दोघे जण जखमी झाले आहेत. या प्रकरणी दहिसर पोलिसांनी तक्रार दाखल करून दोघांना ताब्यात घेतले आहे. तसेच पुढील तपास सुरु केला आहे.