काश्मीर – वाजपेयी पर्व (पुस्तक परिक्षण)

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुस्तक परीक्षक : प्रणव पाटील

#रविवार_विशेष

पृथ्वीतलावर कोठे स्वर्ग वसलेला आहे तर तो कश्मीरमध्ये वसलेला आहे असे एका कवीने म्हणले आहे. परंतु या स्वर्गाला जमातवाद, दहशतवाद, फुटीरतावाद या सर्वांचा कलंक लागला आहे. दोन देशांच्या वादात हा भूमीचा सुंदर तुकडा रुतून पडला आहे. तरीही कश्मीरमध्ये स्वतःची निसर्गदत्त धमक आहे जी या स्वर्गाला कोणत्याही परिस्थितीत नरक होऊ देत नाही. कश्मीरवर ही परिस्थिती का आली. कश्मीरची जमिनी स्थिती काय आहे. काश्मीरला या दलदलीतून बाहेर काढता येईल का. कसे काढता येईल या सर्व प्रश्नांच्या उत्तराच्या जवळ घेऊन जाण्याची क्षमता ए.एस.दुलत यांच्या काश्मीर-वाजपेयी पर्व या पुस्तकात आहे.
प्रस्तुत पुस्तक अत्यंत महत्वपूर्ण आहे कारण या पुस्तकाचे लेखक ए.एस.दुलत हे भारतीय गुप्तचर यंत्रणा RAW चे माजी महासंचालक होते. तसेच या आधी ते काश्मीर राज्याचे आय.बी.प्रमुख होते. पंतप्रधान वाजपेजी यांच्या काळात ते पंतप्रधानांचे काश्मीर विषयाचे सल्लागार म्हणून कार्यरत असल्यामुळे त्यांनी पुस्तकाममध्ये दिलेली उदाहरणे, वस्तुस्थिती ही अतिशय विश्वासार्ह आहे. प्रदीर्घ काळ काश्मीरमध्ये काम केल्यानंतर त्यांनी भारतीय कंधार विमान अपहरण असो, माजी केंद्रीय गृहमंत्री मुफ्ती सईद यांच्या मुलीचे अपहरण असो वा कारगीलची लढाई असो अशा अवघड तणावग्रस्त वातावरणात जीथे आय.बी.च्या अधिकार्यांना वेचून वेचून ठार मारले जात होते. त्या काळात सगळे भारतीय प्रशासकीय अधिकारीही काश्मीर सोडून पळून जात होत. या काळातही त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला.
दुलत यांच्या मते काश्मीरींशी कायमस्वरुपी संवाद साधत राहणे हाच एकमेव उपाय आह. यामुळे सीमेपलिकडे गेलेल्या अनेक दहशतवाद्यांचं परिवर्तन घडून आलं आणि ते मुख्यप्रवाहात आले. परंतु दिल्लीत बसलेल्या नेत्यांना काश्मीरियतची नसलेली ओळख आणि गैरसमज आणि हवे असलेले जलद परिणाम यामुळे काश्मीरममध्ये भारत सरकार पूर्णपणे यशस्वी होऊ शकलेलं नाही.
या पुस्तकात दुलत यांनी हुर्यत सारखे फुटीरतावादी, त्यांचे नेते त्यांना मिळणारी पाकिस्तानी मदत, काश्मीरमध्ये पाकिस्तानी गुप्तहेर संघटना आय.एस.आय. ची कार्यप्रणाली या विषयी पूर्ण माहीती देताना भारतीय गुप्तचर यंत्रणा आणि पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणांमधील संवाद-बैठकांसारखे मोठे गौप्यस्फोट केले आहेत. दुलत यांचा दहशतवाद्यांपासून, फुटीरतावाद्यांपर्यंत सगळ्यांशी संवाद होता. काश्मीरचे लोकप्रिय नेते आणि मुख्यमंत्री फारुख अबदुल्लांशी तर त्यांची खास मैत्री होती. काश्मीरचे राजकारण हाही एक महत्वाचा विषय पुस्तकामध्ये सविस्तर आहे. यात पी.डी.पी. असो नॅशनल कॉनफरन्स या पक्षांची कार्यप्रणाली, त्यांचे नेते, त्यांचे छूपे अजेंडे या विषयी महत्वाची माहीती तर मिळतेच पण कशाप्रकारे फुटीरतावादी नेते भारताच्या बाजूने झुकल्या नंतर त्यांची हत्या होते याही भयावह रोमांचक घटना दुलत यांनी जवळून पाहून नमूद केल्या आहेत …
वाजपेजी आणि मुशर्फ यांनी कशा प्रकारे काश्मीरचा प्रश्न सोडवत आणला होता परंतु मनमोहन सिंग सरकारने ही संधी वाया घालवली यावरही त्यांनी उहापोह केला आहे.
दुलत यांनी स्वतः कशाप्रकारे दहशतवाद्यांशी बोलून त्यांना मुख्य प्रवाहात आणलेहेही वाचण्यासारखे आहे. यात शाबिर शहा, नईम कुरेशी, फिरदौस यांच्या सारखे बडे अतंकवादीही आहेत. तसेच इतके वर्षे भारतीय सैन्य तिथे आसल्यामुळे त्यांचे हितसंबंध तयार झाले आहेत यावरही त्यांनी प्रकाश टाकला आहे.
काश्मीर प्रश्न भावनिक न होता अभ्यासायचा असेल तर हे पुस्तक नक्कीच वाचायला हवं. कारण काश्मीरी माणूस हा अनेक वर्षे भारतीय सैन्य, फुटीरतावादी, दहशतवादी, पाकिस्तान यांच्यात पिचलेला आहे आणि वाजेपींचा संवादाचा उपक्रमच यावर कसा तोडगा काढू शकतो हे यातून समोर येते.

पुस्तक परीक्षक – प्रणव पाटील

(लेखक आय.एल.एस. लाॅ काॅलेज येथे वकीलीचे शिक्षण घेत असून आतंरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक आहेत)

काश्मीर – वाजपेयी पर्व
लेखक – ए.एस.दुलत
अनुवाद – चिंतामणी भिडे
इंद्रायणी प्रकाशन,पुणे
मूल्य – 375

Leave a Comment