खडसेंचे समर्थक असल्यामुळे भाजप आमदाराला तिकीट नाकारलं..!!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नंदुरबार प्रतिनिधी । विधानसभा निवडणूक जस जश्या जवळ येत आहेत तसे नेत्यांचे राजकीय पक्षांमधील इनकमिंग आणि आऊटगोईंग जोरदार सुरु झाल्याचे दिसत आहे. भाजपाकडून उमेदवारांच्या दोन याद्या आतापर्यंत जाहीर झाल्या आहेत. जाहीर झालेल्या यादीत आपले नाव नसल्यामुळे बहुतेकांनी बंडाचा पवित्रा घेतला आहे. नंदुरबार जिल्ह्यातील भाजपचे शहादा विधानसभेचे विद्यमान आमदार उदेसिंग पाडवी या गोष्टीला अपवाद राहिले नाही आहेत. आमदार पाडवी यांना पुन्हा एकदा पक्षाकडून उमेदवारी मिळेल असे वाटते होते. मात्र भाजपने जाहीर केलेल्या दुसऱ्या यादीत आपले नाव न आल्याचे कळताच आपण खडसे समर्थक असल्यामुळेच, आपले तिकीट कापले असल्याचे सांगत, त्यांनी आता बंडाचे हत्यार उपसले आहे.

भाजपने उमेदवारी नाकारलेले आमदार पाडवी हे आता भाजप सोडण्याच्या तयारीत असून त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करून निवडणूक लढविण्याचे स्पष्ट केले आहे. त्यांच्या पक्ष सोडून जाण्याने ‘भाजपा’ला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. पाडवी यांनी भाजपा नेते डॉ.विजयकुमार गावित यांच्या विरोधात नंदुरबार विधानसभा मतदार संघातून काँग्रेस कडून निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

भाजप सोडत असतांना पाडवी यांनी भाजपावर जोरदार टीका केली. आपली खंत व्यक्त करत पाडवी म्हणाले की, ‘केवळ एकनाथ खडसेंचा कट्टर समर्थक असल्यामुळे माझे तिकीट कापलं असल्याचं पाडवी म्हणाले. मतदारसंघाचा विकास करूनही डावललं जात असेल तर अशा पक्षात राहण्यात काही अर्थ नाही म्हणत पाडवी यांनी बंडाचा पवित्रा घेतला.

Leave a Comment