भारत हा विविधतेने नटलेला देश. प्रत्येक कोसावर येथील संस्कृती,परंपरा,चालीरीती यांत भिन्नता आढळते. त्यात सण उत्सव-साजरे करण्याबाबत विचार करायचा झाला तर त्यात बऱ्याच समान गोष्टीं सोबत वेगळेपण जाणवते. प्रत्येक प्रदेशात सण साजरे करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. दिवाळी हा त्यापैकीच एक सण जो संपूर्ण भारतभर मोठ्या उत्साहाने साजरा होतो. विशेष म्हणजे तो साजरा करण्याच्या कालावधीत सुद्धा प्रदेशवार भिन्नता आहे. महाराष्ट्राच्या उत्तरेकडील प्रांतांत पौर्णिमेनंतरच्या दिवसापासून पुढचा महिना सुरू होतो, त्यामुळे जेव्हा महाराष्ट्रात, कर्नाटकात आणि आंध्र प्रदेशात आश्विन महिन्याचा कृष्ण पक्ष चालू असतो, तेव्हा या प्रांतांत तो कार्तिक महिन्याचा कृष्ण पक्ष असतो. त्यामुळे दिवाळीचे ५ दिवस साजरे करताना दोन्ही उत्तर आणि दक्षिण भागात मागेपुढे हे दिवस लोक साजरे करतात. आज आपण भारत तसेच अन्य प्रदेशात दिवाळी सण कसा साजरा करतात ते पाहणार आहोत.
राजस्थान
राजस्थानी लोक दिवाळीचा संबंध राम वनवासातून परत आला,त्या मंगल घटनेशी जोडतात. काही ठिकाणी लंकादहनाचा देखावा उभा करून त्यातून शोभेची दारू उडवतात. मांजरीला लक्ष्मी मानून तिचे कौतुक करतात. तिने कितीही त्रास दिला तरी तिला मारत नाहीत. दिवाळीतल्या चतुर्दशीला रूपचौदस म्हणतात. त्या दिवशी स्त्रिया सूर्योदयापूर्वी स्नान करून विशेष शृंगार करतात. संध्याकाळी मुली मस्तकावर ‘घुड्ल्या’ घेऊन घरोघर फिरतात. घुडल्या म्हणजे सच्छिद्र घडा असतो व त्यात दिवा लावलेला असतो. अमावास्येला लक्ष्मीपूजन फार थाटाने करतात.प्रतिपदेला खेंखरा म्हणतात. त्या दिवशी गोवर्धन पूजा व अन्नकूट करतात. याच्या दुसर्या दिवशी राजदरबारी व घरोघरी दौतीची व लेखणीची पूजा होते.
पंजाब
पंजाबातील लोक रामराज्याभिषेकाच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिवाळीची दीपोत्सव करतात. तिथले शीख लोक अमृतसरच्या सुवर्ण मंदिराच्या स्थापनेचा स्मृतीदिन म्हणून हा सण पाळतात. या दिवशी गुरुद्वारातील पूजनाला विशेष महत्व असते.
हरियाणा
दिव्यांची आरास करतात, मुलांचे दारुकाम असते. लक्ष्मीपूजन हा दिवाळीतील मुख्य कार्यक्रम असतो.
उत्तर प्रदेश
उत्तर प्रदेशमधील डोंगराळ भागातले लोक दिवाळीच्या दिवशी गायींची पूजा करतात व रात्री गावाच्या सीमेवर जाऊन मशालींच्या प्रकाशात नाचतात. काही लोक कुबेराची पूजा करतात, तर काही लोक देवीची पूजा करून तूपभात व साखर खातात.
नेपाळ
नेपाळमध्ये दिवाळीच्या दिवसात द्यूतक्रीडेला विशेष महत्व आहे. नेपाळी लोक लक्ष्मीपूजन तर करतातच, पण शिवाय कुत्रे, गायी, बैल यांचीही पूजा करतात.
गोवा
गोव्यातील दिवाळी सामुदायिक आतिथ्याची असते. शेजारी पाजारी एकत्र जमून प्रत्येकाकडे जातात आणि दूधगुळाच्या पोह्यांचा फराळ करतात.
दक्षिण भारत
दक्षिण भारतात या दिवशी सूर्योदयापूर्वी केलेले स्नान गंगास्नानाइतके पवित्र मानले जाते. तमिळनाडूमध्येही काही लोक नरकचतुर्दशीला सूर्योदयापूर्वी दोनदा स्नान करतात. आंध्र प्रदेशातील लोक घरासमोर एक मचाण बांधून त्यावर पणत्या लावतात व स्त्रिया त्याच्यावर बसून रात्रभर लक्ष्मीच्या स्वागताची गाणी गातात. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी रेड्यांच्या टकरी लावतात. आश्विनी अमावास्येला केलेले पितृतर्पण विशेष फलप्रद मानतात.