सांगली प्रतिनिधी। विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी केली जाणार आहे. आचारसंहिता भंग केल्यास तात्काळ कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिला. पारदर्शी, भयमुक्त वातावरणात निवडणूका पाडण्यात येईल, तसेच दिव्यांग मतदारांच्या सोयीसुविधा पुरवण्याकडे दुर्लक्ष करण्यात येवू नये, अशा सूचनाही यावेळी देण्यात आल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणुकीच्या अनुषंगाने विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत, महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस, पुणे विभागीय उपायुक्त संजयसिंह चव्हाण, उपायुक्त साधना सावरकर, अप्पर जिल्हाधिकारी गोपीचंद कदम, निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी बर्डे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. स्वाती देशमुख यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर म्हणाले, आचारसंहिता भंग होत असेल तिथे कठोर कारवाई करावी. संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत. यावेळी त्यांनी निवडणूक कामकाजासाठी कर्तव्यावर असणाऱ्या अधिकारी कर्मचारी मतदानापासून वंचित राहणार नाहीत, याची दक्षता घेण्याचेही निर्देश दिले. मनुष्यबळ, ईव्हीएम, व्हीव्हीपॅट, वाहतूक, प्रशिक्षण आणि साहित्य सामग्री व्यवस्थापन, सी-व्हिजील, आचारसंहिता कक्ष, खर्च नियंत्रण, उत्पादन शुल्क विभागाकडून होणारे मॉनिटरिंग, माध्यम प्रमाणिकरण आणि संनियंत्रण समिती आदि बाबींचा आढावा घेऊन भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने एसएसटी पथके, चेक नाके, प्रतिबंधात्मक कारवाई, गस्त आदिंबाबत डॉ. म्हैसेकर यांनी आढावा घेतला.