#HappyDiwali | दिवाळी म्हटलं की फटाके आलेच, पण तामिळनाडूच्या काही गावांमध्ये वेगळंच चित्र पाहायला मिळत आहे. या गावांमध्ये मागच्या काही वर्षांपासून ‘सायलेंट दिवाळी’ साजरी केली जाते. तमिळनाडूतील या गावांत फटाके वाजवले जात नाहीत. फटाके न वाजवण्याचं कारणही तसंच खास आहे.
त्रिची जिल्ह्यातील थोप्पुपट्टी आणि सांपट्टी या दोन गावातील लोक दिवाळीच्या वेळी फटाके उडवत नाहीत. याचं कारण म्हणजे गावाच्या आजूबाजूला असलेल्या वडाच्या झाडांवर राहणारे हजारो वटवाघूळ. या वटवाघूळांना त्रास होऊ नये म्हणून फटाके न वाजवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
गावकरी या वटवाघूळांची काळजी घेत असल्याचं कारण फार जुनं आहे. या दोन्ही गावात ५०० लोक राहतात. काही दशकांपूर्वी त्यांनी ही दोन गावं वसवली. गावात पहिल्यांदा राहायला आलेल्या लोकांना तिथल्या झाडांवर वटवाघूळ दिसले होते. काहींनी त्यांना अन्न पाणी द्यायला सुरुवात केली. मग हळूहळू गावकरी आणि वटवाघूळांचं एक नातं तयार झालं. गावकऱ्यांकडून वटवाघूळांची पूजाही करण्यात येऊ लागली. या वटवाघूळांना कसलाही त्रास होणार नाही याची काळजी गावकरी घेऊ लागले. त्याचाच परिणाम म्हणजे गावातली फटाक्यांवर बंदी.