सांगली प्रतिनिधी। प्रथमेश गोंधळे
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने महापालिका क्षेत्रातील सुमारे १५० कोटी रुपयांची कामे आचारसंहितेच्या कात्रीत अडकली आहेत. तर सांगलीतील आयर्विन पुलाला पर्यायी पूल, हरिपूर-कोथळी पूल या कामाला आता दीड महिन्यांची वाट पहावी लागणार आहे.
दरम्यान, पदाधिकाऱ्यांची वाहने मनपा प्रशासनाने ताब्यात घेतली आहेत. पदाधिकाऱ्यांच्या कार्यालर्यातील फलक व नेत्यांची छायाचित्रे देखील काढली आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी राज्यभर आचारसंहिता लागू झाली आहे. २१ ऑक्टोबर मतदान होणार आहे. आचारसंहितेमुळे मनपा क्षेत्रातील सुमारे दीडशे कोटींची कामे ठप्प झाली आहेत. हॉटमिक्स रस्ते, गटारींसह विविध सुमारे ७० कोटीपेक्षा अधिक कामांतील काही कामांच्या वर्कऑर्डर झाल्या आहेत. त्यातील काहींचे मुहूर्त करायचे आहेत.
परंतु आता आचारसंहिता लागू झाल्याने त्या कामांची सुरुवात करता येणार नाही. सोबतच महापालिका स्थानिक विकास निधी, जिल्हा नियोजन समिती, विविध समित्यांच्या माध्यमातूनही कामे मंजूर झाली आहेत. ती कामेही आता अडकणार आहेत. तसेच आयर्विन पुलाला पर्यायी पूल आणि हरिपूर-कोथळी पूलही मंजूर झाला आहे. त्याच्या वर्क ऑर्डरची प्रक्रिया अंतिम टप्प्यात होती. परंतु आचारसंहितेमुळे त्याचा मुहूर्त होऊ शकणार नाही. त्यामुळे किमान दीड-दोन महिने ती कामेही लांबणार आहेत.