सांगली प्रतिनिधी। स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने कुपवाड रस्त्यावरील ऋत्विक नितीन शिंदे याच्याकडून ८ लाख ६० हजार रुपयांचे २१ कॅमेरे जप्त केले आहेत. विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी गुन्हेगारांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार एलसीबीचे पथक सांगली शहर विभागात पेट्रोलिंग करीत गुन्हेगारांची माहिती काढत होते.
त्यावेळी पथकातील संतोष गळवे व गौतम कांबळे यांना बातमीदाराकडून लक्ष्मी मंदिराजवळ राहणारा ऋत्विक शिंदे हा फोटो काढण्याचे कॅमेरे कोठूनतरी आणून त्याची विक्री करण्यासाठी ग्राहकाच्या शोधात लक्ष्मी मंदिराजवळ थांबला असल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार पथकाने त्याvठिकाणी जाऊन शिंदे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता लोकांचा विश्र्वास संपादन करून त्यांच्याकडून फोटो काढण्यासाठी कॅमेरे भाड्याने घेऊन ते कॅमेरे घरगुती अडचण सांगून ते दुसऱ्या लोकांना विकून पैसे घेत होता अशी कबुली दिली.
घेतलेले कॅमेरे घरात ठेवले असल्याचे सांगितले. ऋत्विकच्या घरावर छापा मारून त्या ठिकाणहून ८ लाख ६० हजार रुपये किमतीचे २१ डीएसएलआर कॅमेरे जप्त केले. त्याच्याविरोधात संजयनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याचे समजले. पुढील तपासासाठी संजयनगर पोलिसाच्या स्वाधीन करण्यात आले आहे. सदरची कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने केली.