मुंबई । मुंबईत १५ वर्षाच्या अल्पवीयन मुलीचं अपहरण करुन धावत्या कारमध्ये बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. २९ जुलैच्या रात्री ही घटना घडली. मुलगी घाटकोपर-मानखूर्द लिंक रोडवर एकटी चालत जात असताना तिचं अपहरण करुन बलात्कार करण्यात आला. दैनिक ‘लोकसत्ता’ने पीटीआयच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, पोलिसांनी याप्रकरणी कारवाई करत तीन आरोपींना अटक केली आहे.
“मुलगी चालत जात असताना कार तिच्याजवळ थांबवण्यात आली. कारमधील तिघांनी तिला आत खेचलं आणि तेथून पळ काढला,” अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. बलात्कार केल्यानंतर आरोपींनी पश्चिम द्रुतगती मार्गावर तिला सोडून दिलं असं पोलिसांनी सांगितलं आहे. गेल्या आठवड्यात मानखूर्द पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी मानखूर्दमधील शिवाजी नगर येथून तिन्ही आरोपींना ८ ऑगस्टला अटक केली. आरोपींची नावे सोनू उर्फ दीपक सिंग (२५), नुरुल नलवर (२५) आणि बाबू हकीम अन्सारी (२२)अशी आहेत.
पोलिसांनी आरोपींवर अपहरण, बलात्कार तसंच पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपींमधील एकजण इलेक्ट्रिशिअन तर दुसरा चालक म्हणून काम करतो. तिसरा आरोपी बेरोजगार आहे. गुन्ह्यामध्ये वापरण्यात आलेल्या कारकडे टॅक्सी परवाना आहे. सर्व आरोपींना १५ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत असल्याची माहिती झोन ६ चे डीसीपी शशीकुमार मीना यांनी दिली आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”