नवी मुंबई । नवी मुंबईतील कोरोना बाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच असून आज आणखी २० कोविड पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यात महापे येथील टीटीसी एमआयडीसी इंडस्ट्रीयल इस्टेटमधील एका आयटी कंपनीच्या १९ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या घटनेने एमआयडीसीतील विशेष करून आयटी कंपनीत काम करणाऱ्या सर्वांमध्येच भीतीचे वातावरण आहे. महापे येथील एका आयटी कंपनीत लॉकडाउन असूनही काम सुरू होते. मात्र, हे काम शासनाने घालून दिलेल्या अटी शर्तीचे पालन करून सुरू असल्याचा दावा कंपनीने केला आहे.
याच कंपनीत काम करणाऱ्या आणि कोपरखैरणे येथे राहणाऱ्या एका व्यक्तीला करोनाची लक्षण दिसून आल्यावर त्याची तपासणी करण्यात आली, यामध्ये तो करोनाबाधित असल्याचे समोर आले. त्यानंतर या कंपनीने लगेच त्यांच्या समवेत काम करणाऱ्या सर्वांची एका खासगी लॅबमध्ये करोना चाचणी केली. यामध्ये १९ जणांना कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले. बाधित रुग्णांपैकी मुंबई व नवी मुंबईतील प्रत्येकी ७ जण आहेत. ठाणे व तेलंगणातील प्रत्येकी दोघे असून एक सांगलीचा आहे. तेलंगण व सांगलीतील तिघांनी मार्चपासून या कंपनीत काम सुरू केलं होतं. या घटनेने आता नवी मुंबईतील कोरोनाबाधित रुग्णाची संख्या ८० पेक्षा अधिक झाली आहे.
संबंधित आयटी कंपनीतील १९ जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. मात्र ही चाचणी खासगी लॅबमध्ये करण्यात आल्याने या सर्वांची चाचणी पुन्हा करण्यात येणार आहे. त्यासाठी सर्वांच्या स्वाबचे नमुने घेण्यात आले असून तपासणीसाठी मुंबईत पाठवण्यात आले आहेत, अशी माहिती नवी मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त महादेव पेंढारी यांनी दिली. १० टक्के उपस्थिती आणि बाकीच्यांनी घरी बसून काम करावे असा निर्णय या पूर्वीच घेण्यात आला होता. त्याच अनुषंगाने एमआयडीसीमध्ये आयटी कंपन्याचे काम काम सुरू आहे. हे काम करत असताना पूर्ण काळजी घेण्याची आवाहन करण्यात आले होते. तरीही ही घटना घडल्याने आता उरल्या सुरल्या कंपन्याही काम करावे की नाही या भीतीच्या सावटाखाली आहेत.
WhatsApp करा आणि लिहा ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला“HelloNews.