सांगली जिल्ह्यात सापडले २८ नवीन कोरोनाग्रस्त; १६ वा बळी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे

जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत असतानाच आज शुक्रवारी पलूस तालुक्यातील नागठाणे येथील ६२ वर्षीय कोरोना बाधित वृद्धाचा हृदय शस्त्रक्रियेनंतर उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यात कोरोना बळींची संख्या हि १६ वर गेली आहे. याशिवाय नव्याने २८ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांनी दिली आहे.

सांगली शहरात सात, मिरजेत तीन, पलूस तालुक्यातील दुधोंडीमध्ये सहा, मिरज तालुक्यातील शिंदेवाडीत दोन, शिराळ्यातील येळापूर आणि कवठेमहांकाळमधील नागजमध्ये प्रत्येकी एक, वाळवा तालुक्यातील खेड येथे एक, वाळवा येथील चौघे इस्लामपूर शहरात दोघे रुग्ण पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले. जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या ६१७ वर गेली असून सद्यस्थितीत ३०३ रुग्णांवर उपचार सुरु असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांनी सांगितले.

मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असताना मृत्यूंची संख्याही वाढू लागली आहे. जुलै महिन्याला सुरुवात झाल्यापासून जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या गतीने वाढत आहे. वाळवा तालुक्यातील नागठाणे येथील ६२ वर्षीय वृद्धाला सांगलीतील भारती रुग्णालयात त्रास होत असल्याने उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्याला त्रास जाणवू लागल्याने त्याची कोव्हीड टेस्ट करण्यात आली होती. काही दिवसांपूर्वी त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. याच दरम्यान या रुग्णावर हृदयविकाराची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. या शस्त्रक्रियेनंतर उपचारादरम्यान त्या वृद्धाचा आज मृत्यू झाला आहे. शिवाय जिल्ह्यात नव्याने २८ रुग्ण आढळून आले.

सांगली महापालिका क्षेत्रामध्ये गेल्या काही दिवसांपासून रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. आज दहा रुग्णांची यात भर पडली. त्यात सांगलीतील पाच जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. येथील चौगुले प्लॉटमध्ये चार व प्रभाग क्रमांक पंधरा येथील अरिहंत कॉलनीतील एक व्यक्ती बाधित असल्याचे स्पष्ट झाले. मिरज शहरात चार रुग्ण आढळून आले. त्यामुळे महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांच्या सुचनेनसार नव्या कंटेन्मेंट झोनबाबतची कार्यवाही केली जात आहे.

मिरज तालुक्यातील शिंदेवाडीत दोन दिवसांपूर्वी रुग्ण आढळले होते. बाधिताच्या संपर्कातील पुन्हा दोन जण पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले. पलूस तालुक्यातील दुधोंडीमध्ये पुन्हा रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. बाधितांच्या संपर्कातील काही लोकांना क्वॉरंटाईन करण्यात आले आहे, परंतू काही लोकांना त्रास होवू लागला होता. त्यामुळे सहा जणांची कोरोना चाचणी घेण्यात आली. त्या सहाही जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

वाळवा येथे दोन दिवसांपूर्वी एक रुग्ण आढळून आला होता. बाधिताच्या कुटुंबास क्वॉरंटाईन करण्यात आले होते. त्यापैकी काही त्रास सुरु झाला होता. त्यांची प्राथमिक तपासणी केली असताना चार जणांमध्ये कोरोनाची लक्षणे आढळून आली. त्यांचे तपासणीसाठी स्वॅब घेतले असता ते सर्व जण पॉझिटिव्ह आले आहेत. शिराळा तालुक्यातील येळापूर येथील एका पुरुषामध्ये कोरोनाची लक्षणे असल्याचे आरोग्य विभागाच्या सर्वेक्षणात आढळले होते. त्यामुळे त्या व्यक्तीला मिरजेतील कोविड रुग्णालयात दाखल केले, तेथे तपासणी केली असता त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. तसेच नागज येथे मुंबईहून आलेला पोलीस देखील पॉझिटिव्ह आला आहे. सध्या पॉझिटिव्ह रुग्णापैकी अकरा जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांनी सांगितले. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाचे ६१७ रुग्ण आढळले आहेत, त्यापैकी १६ व्यक्तींचा मृत्यू झाला असून २९८ जण कोरोनामुक्त झाले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात ३०३ कोरोना रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर दिवसभरात आज ९ जण कोरोनामुक्त झाले आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

 

Leave a Comment