शरद पवारांविषयी आक्षेपार्ह पोस्ट; केतकी चितळे विरोधात गुन्हा दाखल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपल्या वादग्रस्त विधानामुळे नेहमीच चर्चेत असलेली मराठी अभिनेत्री केतकी चितळे ही आता एका नव्या प्रतापामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेली आहे. तीने नुकतेच तिच्या फेसबुक अकाउंटवरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दलची एक आक्षेपार्ह पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टनंतर तिच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. राष्ट्रवादीचे पदाधिकारी स्वप्निल नेटके यांनी हा गुन्हा दाखल केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल काल एका युवकाच्या ट्विटर अकाऊंटवरून धमकी देणारे ट्विट आल्यामुळे संबंधित ट्विट पटवणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर मराठी अभिनेत्री केतकी चितळे हिने आपल्या फेसबुक अकाउंटवरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दलची एक आक्षेपार्ह पोस्ट शेअर केली आहे. केतकीने तिच्या फेसबुक पोस्टमध्ये लिहले की, तुका म्हणे पवारा l नको उडवू तोंडाचा फवारा ll, ऐंशी झाले आता उरक l वाट पहातो नरक, सगळे पडले उरले सुळे l सतरा वेळा लाळ गळे ll, समर्थांचे काढतो माप l ते तर तुझ्या बापाचेही बाप ll, ब्राह्मणांचा तुला मत्सर l कोणरे तू ? तू तर मच्छर ll, भरला तुझा पापघडा l गप! नाही तर होईल राडा ll, खाऊन फुकटचं घबाड l वाकडं झालं तुझं थोबाड ll, याला ओरबाड त्याला ओरबाड l तू तर लबाडांचा लबाड ll असा ओळी केतकीने तिच्या फेसबुक अकाऊंटवरून शेअर केल्या आहेत.

 

केतकीच्या फेसबुक पोस्टनंतर तिच्या विरोधात स्वप्निल नेटके यांनी हा गुन्हा दाखल केला असून त्यांनी म्हटलं आहे की, केतकी चितळेने ही पोस्ट केल्यामुळे पक्षातील नेते, कार्यकर्ते आणि लोकांमध्ये तीव्र नाराजी आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. शरद पवार यांना उद्देशून बदनामीकारक, मानहानीकारक अॅडव्होकेट नितीन भावे नावाच्या व्यक्तीने लिहिलेली पोस्ट केतकी चितळेने शेअर केली आहे.