हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपची हात मिळवणी केल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार अजित पवारांवर नाराज झाले आहेत. मात्र आज या दोघांमध्ये पुण्यातल्या कोरेगाव पार्क येथे गुप्त बैठक पार पडल्याची मोठी माहिती समोर आली आहे. व्यावसायिक अतुल चोरडिया यांच्या घरी ही बैठक पार पडली असून अद्याप या बैठकीचे कारण समोर आलेले नाही. तसेच, या बैठकी संदर्भात दोन्ही नेत्यांकडून कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही.
समोर आलेल्या माहितीनुसार, आज चांदणी चौक येथील उड्डाणपुलाचे उद्घाटन करण्यासाठी अजित पवार पुण्यातच होते. याच दरम्यान त्यांनी कोरेगाव पार्क येथे शरद पवारांची भेट घेतली आहे. ही भेट पुण्यातील व्यवसायिक अतुल चोरडिया यांच्या पार पडली. सर्वात प्रथम चोरडिया यांच्या घरातून अजित पवार यांचा ताफा बाहेर पडला आणि त्यानंतर थोड्याच वेळात शरद पवार यांचा देखील ताफा घराच्या बाहेर पडलेला दिसला. त्यामुळे या दोघांची भेट चर्चेचा भाग बनली आहे. मात्र एका महत्त्वाच्या कारणासाठी अजित पवार यांनी शरद पवारांची भेट घेतल्याचे म्हटले जात आहे.
दरम्यान, गेल्या काही महिन्यांपूर्वीच अजित पवार शिंदे फडणवीस सरकारमध्ये सामील झाले आहेत. मात्र त्यांच्या या निर्णयामुळे शरद पवार आणि अजित पवार यांच्यामध्ये तेढ निर्माण झाली आहे. यापूर्वी देखील पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी अजित पवार गटाच्या मंत्र्यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती. या भेटीवेळी अजित पवार देखील उपस्थित होते. मात्र आज झालेल्या भेटीत फक्त अजित पवार आणि शरद पवार यांच्यातच चर्चा झाल्याचे समोर येत आहे. मुख्य म्हणजे, राजकीय वर्तुळात घडत असलेल्या घडामोडीनंतर या दोघांमध्ये झालेली भेट अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.