मुंबई : हॅलो महाराष्ट्र – ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यामध्ये टी-20 वर्ल्ड कपला सुरुवात होणार आहे. या अगोदर भारतीय टीम श्रीलंकेमध्ये शेवटची टी-20 सीरिज खेळणार आहे. श्रीलंकेतल्या या सीरिजचे नेतृत्व शिखर धवनकडे देण्यात आले आहे. भारताचे महत्त्वाचे खेळाडू इंग्लंडच्या दौऱ्यावर असल्याने या दौऱ्यासाठी युवा खेळाडूंना संधी देण्यात येणार आहे. या टीमची प्रशिक्षकपदाची जबाबदारी राहुल द्रविड सांभाळणार आहे. या सीरिजसाठी शिखर धवनला कर्णधार बनवले असले तरी वर्ल्ड कपमध्ये मात्र त्याला प्लेयिंग इलेव्हनमध्ये संधी मिळणे शक्य नसल्याचे मत भारताचा माजी क्रिकेटपटू आकाश चोप्राने व्यक्त केले आहे.
काय म्हणले आकाश चोप्रा
‘टीम इंडिया शिखर धवनकडे बघत नाही आहे. कारण मागच्यावेळी जेव्हा त्याला टी-20 सामन्यात संधी दिली, तेव्हा एका मॅचनंतरच त्याला बाहेर बसवण्यात आले. पुढच्या चारही मॅच तो बेंचवर बसून होता,’ असे आकाश चोप्रा म्हणाला आहे. या वर्षाच्या सुरुवातीला इंग्लंडविरुद्ध झालेल्या 5 टी-20 मॅचच्या सीरिजमधली पहिली मॅच धवन खेळला, पण या सामन्यात त्याला चांगली कामगिरी करता आली नाही. यानंतर केएल राहुल ओपनिंगला आला. तसेच जर ‘श्रीलंका दौऱ्यात आणि उरलेल्या आयपीएलच्या सामन्यांमध्ये शिखर धवनने सर्वोत्कृष्ट कामगिरी केली तरच त्याला टी-20 वर्ल्ड कपच्या अंतिम-11 खेळाडूंमध्ये विचार होऊ शकतो,’ अशी प्रतिक्रिया आकाश चोप्रा याने दिली आहे.
शिखर धवनला टी-20 आंतरराष्ट्रीय मध्ये फार काही चांगली कामगिरी करता आली नाही. त्याने 63 टी-20 इनिंगमध्ये त्याने 27.88 च्या सरासरीने 1,673 रन केले. यावेळी धवनचा स्ट्राईक रेटही 127.41 आहे. तसेच केएल राहुलने 45 टी-20 मध्ये 39.92 च्या सरासरीने 1,557 रन केले यामध्ये 2 शतकांचा समावेश आहे. राहुलचा स्ट्राईक रेटही 142.19 एवढा आहे. यामुळे राहुलला धवनऐवजी टी-20 मध्ये संधी दिली जाऊ शकते.