दिल्ली | कट्टर विरोधक असलेले शिवसेनेचे अर्जून खोतकर आणि भाजपाचे रावसाहेब दानवे यांच्यात आज पुन्हा दिल्लीत भेट झाली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना आमचे मनोमिलन झाले आहे, जालन्यात गेल्यानंतर आमची भूमिका स्पष्ट करणार असल्याचे दोन्ही नेत्यांनी म्हटल्याने नक्की अर्जून खोतकर शिवसेनेत राहणार की शिंदे गटात जाणार याबाबत राज्याच्या राजकारणात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.
यापूर्वी शिवसेनेचे अर्जून खोतकर आणि रावसाहेब दानवे यांच्यातील वाद टोकाला गेल्याचे अनेकदा पहायला मिळाले आहे. परंतु शिवसेनेतील फूटीनंतर आता गेल्या काही दिवसापासून या दोन्ही नेत्यांच्यात वारंवारं भेटी होत असल्याचे पहायला मिळत आहे. या दोघाच्यांतील वाद मिटविण्यासाठी खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेतला होता. आजही दिल्लीत चहा आणि नाश्ताच्या निमित्ताने एक तासभर रावसाहेब दानवे यांच्या निवासस्थानी दोन्ही नेते दिसून आले.
यावेळी रावसाहेब दानवे म्हणाले, कोणी- कोणाचा राजकारणात कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो. सेना- भाजप युतीने जालन्यात वर्चस्व ठेवले. मी आजचे निमंत्रण दिल्याने अर्जून खोतकर आज आले होते. आमच्यातील मतभेद एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत एकमेंकांना साखर भरवून मिटलेले आहेत. शिंदे गट ही मूळ शिवसेना आहे.
जालन्यात गेल्यानंतर भूमिका स्पष्ट करणार अर्जून खोतकर
अर्जून खोतकर म्हणाले, गेले 40 वर्षे आम्ही एकत्र काम केले असून आमचे संबध आहेत. काही कारणावरून आमच्यात कटूता आली आहे. मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत योगायोगाने भेटलो. केवळ भेटीमुळे आपण काहीही तर्क बांधू नयेत. मी शिवसेनेत आहेत. मात्र, माझी जी काही भूमिका आहे, ती जालन्यात गेल्यानंतर स्पष्ट करेंन. मात्र, जालन्यात गेल्यानंतर श्री. खोतकर काय भूमिका घेणार याकडे जालन्यासह राज्यातील शिवसैनिकांचे लक्ष लागून राहिले आहे.