…त्यावेळी उद्धव ठाकरेंची भाजपसोबत जायची इच्छा होती; अजित पवार गटाच्या नेत्याचा गौप्यस्फोट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| “भाजपा आणि शिवसेनेची युती तुटल्यानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यामध्ये एक भेट झाली होती. त्यानंतर उद्धव ठाकरेंचं मत बदललं होतं, त्यामुळे ते परत भाजपाबरोबर येण्यास तयार  झाले होते” असा खळबळजनक दावा अजित पवार गटातील खासदार सुनील तटकरे (Sunil tatkare) यांनी केला आहे. मात्र तटकरे यांनी केलेल्या या दाव्याला खासदार संजय राऊत यांनी फेटाळून लावले आहे. तसेच तटकरे पूर्णपणे खोटे बोलत आहेत असा आरोप देखील राऊत यांनी केला आहे. सध्या तटकरे यांनी केलेल्या दाव्यानंतर राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.

सुनील तटकरे काय म्हणाले?

उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदी यांच्यातील 2021 मध्ये झालेल्या भेटीचा उल्लेख आज सुनील तटकरे यांनी केला. यावेळी बोलताना सुनील तटकरे म्हणाले की, “उद्धव ठाकरे यांनी 2021 मध्ये अजित पवार आणि अशोक चव्हाण यांच्याबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. या बैठकीनंतर माझी संजय राऊतांबरोबर बैठक झाली तेव्हा मला कळलं की, दिल्लीतील बैठकीनंतर उद्धव ठाकरेंची पंतप्रधान मोदींबरोबर एकांतात चर्चा झाली आहे. त्यावेळी उद्धव ठाकरे पुन्हा भाजपासोबत जाण्याचा विचार करत होते”

त्याचबरोबर, “माझी संजय राऊत यांच्याबरोबर बैठक झाली तेव्हा तेथे एकनाथ शिंदे आणि मिलिंद नार्वेकरही हजर होते. त्यावेळी संजय राऊतांनी मला सांगितलं की, मोदींबरोबरच्या चर्चेनंतर उद्धव ठाकरे आपलं मत बदलण्याची शक्यता आहे आणि ते पुन्हा भाजपाबरोबर जाण्याचा विचार करत आहेत” असे सुनील तटकरे यांनी सांगितले आहे.

दरम्यान, “त्याकाळात शरद पवार आजारी असताना वर्षा बंगल्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे भेटायलाही आले नव्हते. ३-४ महिने शरद पवारांशी संवाद बंद होता. याबाबत तीव्र नाराजी संजय राऊतांनी माझ्याकडे व्यक्त केली होती” असे अशी माहिती देखील सुनील तटकरे यांनी दिली आहे. त्यांनी केलेल्या या गौप्यस्फोटानंतर आता उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदी यांच्या भेटीविषयी तर्कवितर्क लावले जात आहेत. माञ अद्याप उद्धव ठाकरे यांनी गौप्यस्फोटाविषयी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.