जयपूर । सचिन पायलट यांच्या बंडानंतर राजस्थानमधील काँग्रेस सरकारसमोर अस्थिरतेचं संकट उभं राहिलं होतं. दरम्यान, राजस्थानमध्ये अचानक उफाळलेल्या या बंडाळीमुळे काँग्रेस सर्तक झाली असून, राज्यभरातील सर्व जिल्हा व गट समित्या बरखास्त करण्याचा निर्णय घेतला आहे. राजस्थानचे प्रभारी प्रदेशाध्यक्ष अविनाश पांडे यांनी ही माहिती दिली.
काँग्रेसचे राजस्थानमधील प्रभारी प्रदेशाध्यक्ष अविनाश पांडे यांनी यासंदर्भात महत्त्वाचं ट्विट केलं आहे. “राजस्थानमधली सर्व जिल्हा काँग्रेस समित्या, गट समित्या तात्काळ बरखास्त करण्याचा निर्णय अखिल भारतीय काँग्रेस समितीनं घेतला आहे. नवीन समित्या नियुक्त करण्याची प्रक्रिया लवकरच सुरू केली जाईल,” पांडे यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
AICC has decided to dissolve all the District Congress Commities and Block Congress Committees of Rajasthan Pradesh with immediate effect. The process of formation of new committees will begin soon.
— Avinash Pande (@avinashpandeinc) July 15, 2020
सचिन पायलट यांनी बंड पुकारल्यामुळे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या नेतृत्त्वाखालील काँग्रेसचं राजस्थानमधील सरकार अडचणीत आलं होतं. अशोक गेहलोत व पायलट यांच्यामधील मतभेद प्रथमच टोकाला पोहचल्याचं बघायलं मिळालं. रविवारपासून सुरू झालेल्या या राजकीय बंडामुळे राजस्थानात बऱ्याच घडामोडी घडल्या. काँग्रेसनं सचिन पायलट यांना उपमुख्यमंत्री व प्रदेशाध्यक्ष पदावरून दूर केलं. त्यानंतर आता संपूर्ण राजस्थानमध्ये नव्यानं पक्ष बांधणी करण्याचा निर्णय घेतला आहे.