काय चाललंय काय? अपॉइंटमेंट मिळूनही पुण्यातील वायुसेना लसीकरण केंद्राचा नागरिकांना लस देण्यास नकार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | करोणाच्या दुसऱ्याला लाटेने मोठ्या प्रमाणात हाहाकार माजवला आहे. अशा परिस्थितीमध्ये लसीकरण होणे खूप महत्त्वाचे आहे असे अनेक तज्ज्ञांनी म्हटले आहे. यासाठी शासनाने लसीकरण केंद्र वाढवले. आणि 18 ते ४४ या वयोगटाचे लसीकरणही सुरू केले. केंद्र शासनाच्या COWIN या पोर्टलवर लसीकरणासाठी अपॉइंटमेंट दिल्या जात आहेत. या अपॉइंटमेंटमध्ये वायुसेनेच्या लसीकरण केंद्राचा समावेश आहे. ज्या नागरिकांना या लसीकरण केंद्राची अपॉइंटमेंट मिळते, ते नागरिक या केंद्रावर गेले असता वायु सेनेकडून त्यांना, ‘आमच्याकडे सिविलियन लोकांचे लसीकरण केले जात नाही’ असे कारण सांगून गेटवरूनच परत पाठवले जात आहे. यामुळे केंद्र शासन, COWIN पोर्टल आणि लसीकरण केंद्र यांच्यामध्ये समन्वयाचा अभाव असल्याचे दिसून येत आहे.

पुण्यातील विमाननगर येथे वायुसेनेचे ‘एसएमसी एअर फोर्सस्टेशन’ हे लसीकरण केंद्र आहे. COWIN पोर्टलवरती याची नोंदणी सगळ्यांसाठी दाखवत आहे. दिवसातून जवळपास दीडशे ते दोनशे नागरिकांची लसीकरणासाठी नोंदणी या केंद्रावर कली जाते. यासोबतच लसीकरणाच्या अपॉइंटमेंट सुद्धा नागरिकांना दिल्या जात आहेत. परंतु, लसीकरण केंद्रावर गेल्यानंतर नागरिकांना गेटवरूनच परत पाठवण्यात येत आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागातून आलेल्या दिव्यांग, जेष्ठ नागरिक आणि तरुणांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

या लसीकरण केंद्रावरील केंद्राच्या गेटवरील अधिकाऱ्याला विचारले असता त्यांनी लसीकरण केंद्राकडे सोडण्यास पूर्णपणे नकार दिला. “तुम्ही ‘सिव्हिलियन’ नागरिक असल्यामुळे, आम्ही तुम्हाला आत सोडू शकत नाही. या केंद्रावर सिविलियन नागरिकांचे लसीकरण होत नाही. वायूसेनेच्या लोकांनाच कमी लसी शिल्लक असून सिव्हिलियन नागरिकांना त्यामुळे देता येणार नाहीत” असे सांगून नागरिकांना परत पाठवण्यात येत होते. हे केंद्र १८-४४ आणि 45 च्या वरील नागरिकांसाठी COWIN पोर्टलवर रजिस्टर आहे. यामुळे दिव्यांग, तरुण मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत या केंद्रावर लसीकरणासाठी नागरिक येत असतात. पण त्यांना लसीकरण केंद्राने परत पाठवल्याने नाहक त्रास सहन करावा लागतो आहे.

You might also like