हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी नुकताच पूरग्रस्त विदर्भ आणि मराठवाडा जिल्ह्याचा दौरा केला. दौऱ्यानंतर त्यांनी पूरग्रस्त परिस्थिती आणि मंत्रिमंडळ विस्ताराच्या मुद्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. “नवीन सरकार राज्यात आल्यानंतर अद्यापही मंत्रिमंडळ विस्तार झाला नसल्याने अनेक चर्चा सुरू आहेत. राज्यात महिनाभरानंतरही मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. सर्वांना मंत्रिपदाची ऑफर दिल्यानेच मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला आहे, अशी टीका पवारांनी केली.
मुंबईत पत्रकार परिषद घेत विरोधी पक्षनेते पवार म्हणाले की, नुकताच मराठवाड्याचा दौरा केला आहे. या याठिकाणी पुराचा मोठा फटका बसला आहे. परंतु अजूनही सरकारी मदत मिळालेली नाही. बीडमध्ये गोगलगायमुळे पीक गेले आहे. यामध्ये काही हजार हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. सुरुवातीला काही भागात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी दौरा केला.
मात्र, त्यानंतर लक्ष दिले नाही. खरंतर केंद्राच्या पाहणी पथकाला बोलवायला हवे होते. मात्र अजूनही तसे करण्यात आलेले नाही. म्हणून आपण आज राज्यपालांची भेट घेणार असून त्यांच्याशी चर्चा करून नुकसानग्रस्त भागास तातडीने मदत देण्यात यावी, अशी मागणीकरणार असल्याचे पवारांनी सांगितले.
उपमुख्यमंत्र्यांना अजून कोणतंच खातं नाही – पवार
अजित पवारांनी यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. शपथविधी होऊन एक महिना झाला तरी अजूनही उपमुख्यमंत्र्यांना सह्यांचे अधिकार दिलेले नाहीत कि कोणते खातेही दिलेले नाहीत. त्यामुळे प्रत्येक फाईल ही मुख्यमंत्र्यांकडे जात आहे. बऱ्याच फाईल अजूनही थांबलेल्या आहेत. त्यामुळे अनेक कामे थांबली असून जनतेची कामे खोळंबली असल्याचे पवार यांनी म्हटले.