हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : पंढरपूर विधानसभा पोट निवडणूक प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस होता. दिवसभरात भाजप आणि राष्ट्रवादी कडून जोरदार प्रचार सभा घेण्यात आल्या. भाजप व राष्ट्रवादी या दोन्ही पक्षातील नेत्यांनी एकमेकांवर मोठ्या प्रमाणात चिखलफेक केली. पहिल्यांदा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना डिवचल. त्यानंतर पाटलांनीही पवारांना खबरदार असा इशारा दिला. एवढं सांगूणही प्रचाराच्या शेवटच्या सभेत अजित पवारांनी पुन्हा दुसऱ्यांदा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना डिवचलं. चंद्रकांत पाटील यांनी कधी शेती केली आहे का? भाजप ग्रामीण भागातील प्रश्न सोडवू शकत नाही, असा टोला अजित पवार यांनी लगावला.
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी अजित पवार आज पुन्हा एकदा पंढरपुरात आले होते. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके यांना विजयी करण्याचं आवाहन पंढरपुरातील मतदारांना केल. यावेळी पवार म्हणाले, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या विचारधारेतून पक्ष वाटचाल करत आहे. शेतकरी जगला तरच राज्य जगेल. विरोधी पक्षाचे नेते येतात आणि टीका करतात. पण तुमचं सरकार होतं तेव्हा तुम्ही काय दिलं? असा सवाल अजितदादांनी केलाय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले होते की चांद्यापासून बांद्यापर्यंत विकास करु, पण कोरोनाचं संकट आलं. खरं तर ही निवडणूक व्हायला नको होती. पण भाजपने आडमुठेपणाची भूमिका घेत निवडणूक बिनविरोध होऊ दिली नाही.
साखर कारखान्यांच्या प्रश्नाला उत्तर देताना पवार म्हणाले, कोरोनाच्या लाटेत सर्वाधिक नुकसान पंढरपूर तालुक्याचं झालं. अनेक नेते सोडून गेले. आता तुम्ही महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून द्या, डबल निधी देतो, असं आश्वासनही अजित पवारांनी आपल्या भाषणात दिलंय. राज्यातील साखर कारखान्यांचे प्रश्न महाविकास आघाडीच सोडवू शकते. पंढरपूर-मंगळवेढा तालुक्यातील कारखाने मी स्वत: संचालक म्हणून निवडून देणार, असा दावाही अजितदादांनी यावेळी केलाय. आजची ही सभा सांगता सभा नाही तर विजयाची सभा असल्याचं सांगत भगीरथ भालके यांचा विजय निश्चित आहे.