हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) आपल्या समर्थक आमदारांसह भाजपमध्ये जाणार अशा बातम्या गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात सुरु आहेत. द इंडियन एक्प्रेसमध्ये याबाबत वृत्त आल्यामुळे अनेक तर्क वितर्क लढवले जात होते. अखेर आज अजित पवार यांनी स्वतः आपली भूमिका स्पष्ट केली आहे. माझ्याबाबत गैरसमज पसरवले जात आहेत. पण जोपर्यंत जीवात जीव आहे तोपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच राहणार असं म्हणत अजित पवार यांनी सर्व चर्चाना पूर्णविराम दिला.
अजित पवार यांनी पत्रकार परिषद आयोजित करत आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, आत्ता माझ्याबाबत जय काही बातम्या चालवल्या जात आहेत त्यामध्ये काहीही तथ्य नाही. कारण नसताना माझ्याबद्दल गैरसमज पसरवले जात आहेत. मी कोणत्याही पत्रावर आमदाराची सही घेतली नाही. मी नेहमीप्रमाणे माझ्या ऑफिसमध्ये बसतो, अनेक जण कामानिमित्त येत असतात. नेहमीप्रमाणे आज मला भेटायला आमदार आले. त्यामध्ये वेगळा अर्थ काढू नका असं अजित पवारांनी म्हंटल.
आम्ही सगळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आहोत. 1999 साली राष्ट्रवादी काँग्रेसची स्वाभिमानाने स्थापना झाली आहे. तेव्हापासून आम्ही काम करत आहोत. जोपर्यंत जीवात जीव आहे तोपर्यंत शरद पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच राहणार आहे. त्यामुळे माझ्या बाबतच्या चर्चा थांबवा, त्याचा आता तुकडा पाडा असेही अजित पवार यांनी म्हंटल.
यावेळी त्यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावरही नाव न घेता निशाणा साधला. दुसऱ्या पक्षाचे काही प्रवक्ते आज आमच्या पक्षावर बोलायला लागलेत. आमच्या पक्षातील बाजू आम्ही मांडू तुम्हाला मांडण्याचा कोणी अधिकार दिला ? तुम्ही तुमच्या पक्षाचे काय सांगायचं ते सांगा. आमची भूमिका स्पष्टपणे मांडायला आम्ही खंभीर आहोत, दुसऱ्या कोणी आमचं वकीलपत्र घेऊ नये असं अजित पवार यांनी म्हंटल.