सावरकर वादावर अजित पवारांनी स्पष्ट केली राष्ट्रवादीची भूमिका; म्हणाले की, आपल्याला …

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या स्वातंत्र्यवीर सावरकर वादावरून महाविकास आघाडीमध्ये बिघाडी होते का अशी शक्यता निर्माण झाली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सावरकर यांचा उल्लेख माफीवीर असा केल्यानंतर शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाला आहे. सावरकरांचा अपमान सहन करणार नाही असं म्हणत उद्धव ठाकरेंनी राहुल गांधींना ठणकावलं. त्यानंतर आता राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सावरकर वादावर राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली आहे. बारामती येथील एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी पक्षाची भूमिका जाहीर केली.

यावेळी अजित पवार म्हणाले, “उद्धव ठाकरे यांनी सावरकरांबद्दल त्यांची काय भूमिका आहे? हे परवा मालेगावात सांगितलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला सगळ्या महापुरुषांबद्दल आदर आहे. आपण सगळ्यांनी नेहमी महापुरुषांबद्दल सन्मान आणि आदराचीच भावना ठेवली पाहिजे. काँग्रेसने आपली भूमिका मांडावी. पण आपण सर्व जाती-धर्माला बरोबर घेऊन पुढे जात आहोत. हीच आपली सर्वधर्म समभाव भूमिका आहे. त्यामध्ये आपल्याला अंतर पडू द्यायचं नाही.

आपल्याला प्रत्येक जातीचा, धर्माचा आणि पंथाचा आदर करायचा आहे. सगळ्यांचे सण साजरे करायचे आहे. कोणत्याही दोन समाजात तेढ निर्माण होणार नाही. दरी निर्माण होणार नाही, हीच शरद पवारांची भूमिका आहे. शाहू-फुले-आंबेडकर यांची भूमिका आणि त्यांच्या विचारसरणीने आपण पुढे चाललो आहोत. महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी, सर्व घटकांच्या विकासासाठी आपण काही बाबतीत एकत्र येतो,” असं वक्तव्य करत सावरकर वादावर अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली आहे.