हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एसटी कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी आंदोलन केले. आंदोलनानंतर एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांना 11 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी तर 109 आंदोलक कर्मचाऱ्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधान केले आहे. “कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामागे इतर काही शक्ती आहे. कर्मचाऱ्यांना सांगायचो कि कुणाच्यातरी चिथावणीखोर भाषणाला बळी पडू नका. त्यांच्या चुकीच्या सल्ल्याला बळी पडू नका. हे तुम्हाला अडचणीत आणतील,” असे महत्वाचे विधान पवार यांनी केले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुण्यात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, कारण नसताना काही काही लोकांकडून एसटी कर्मचाऱ्यांना भडकवले जात आहे. त्याच्या या आंदोलनामागे नक्की इतर काही शक्तींचा हात असल्याचा आम्हाला संशय आहे. आम्ही अनेकवेळा कर्मचाऱ्यांना सांगितले कि आंदोलने करू नका. कुणाच्याही चिथावणीखोर भाषणाला बळी पडू नका. त्यांच्याकडून दिल्या जाणाऱ्या चुकीच्या सल्ल्याला बळी पडू नका.
एके दिवशी तेच लोक तुम्हाला अडचणीत आणतील. मात्र, कर्मचाऱ्यांनी ऐकले नाही. आणि अशात काही जणांनी जाणीवपूर्वक समाजात नीट कारभार चाललेला असताना त्यात खोडा कसा घालता येईल? नवीन समस्या कशा निर्माण करता येतील? लोकांच्या भावना कशा भडकवता येतील? असे प्रकार केले, असेही यावेळी पवार यांनी सांगितले.