हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रात वाढत चाललेल्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही निर्बंध घालण्यात आले आहेत. त्याचबरोबर काही महत्वाच्या नेत्यांकडून राज्यात पुन्हा लॉकडाऊन होण्याबाबतचे संकेत देण्यात आले आहेत. या दरम्यान आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज राज्यात लॉकडाऊन लागण्यासंदर्भात संकेत दिले असून राज्यात ऑक्सिजन, व्हेंटिलेटरची तयारी करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे. राज्य सरकार मुख्यमंत्री ठाकरेंच्या नेतृत्वात काम करत असून ज्या उद्योगाची ऑक्सिजन वाढवण्याची क्षमता आहेत त्यांनी ती वाढवावी, असे आवाहन उपमुख्यमंत्री पवार यांनी केले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे येथे आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, यावर्षी पार पडलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात आम्ही ग्रामीण रुग्णालयाला मोठी मदत केली आहे. कोरोनाचे प्रमाण कमी करण्यासाठी आणि आयोग्य यंत्रणेला मदत करण्यासाठी सरकार म्हणून आम्ही खबरदारी घेत आहे.
आम्ही महापालिकेच्या रुग्णालयात ऑक्सिजनची व्यवस्था करण्याचे आदेश दिले आहेत. जिल्हा नियोजनातील 20 टक्के खर्चाची मान्यता दिली आहे. मात्र, अशा परिस्थितीत सर्व नागरिकांनी कोरोनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे जास्त गरजेचे आहे. पहिला आणि दुसरा डोस सर्वांनी घ्यावा असा आपला आग्रह होता. पहिल्या डोसबाबत नागरिक जागरुक होते. मात्र, आता दुसऱ्या डोसबाबत नागरिकांना गांभीर्य येत नाहीत. ग्रामीण भागात लसीकरणाला प्रतिसाद मिळत नसल्यामुळे आता घरोघरी जाऊन नागरिकांची तपासणी करुन लसीकरण करावेत, अशा सूचना दिल्या असल्याचे पवार यांनी यावेळी सांगितले.