हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्र कर्नाटक सीमावादावर काल दिल्लीत पार पडलेल्या बैठकीत कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी ज्या ट्विटर अकाऊंटवरून माझ्या नावाने ट्विट करण्यात आलं, ते ट्विटर अकाऊंट माझं नव्हतं, असे म्हंटले. यावर राज्याचे विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “ट्विटरवर कोणी जाणीवपूर्वक बातम्या सोडल्या का? याची शहानिशा करून दूध का दूध आणि पानी का पानी करावं. तसेच यामागचा मास्टरमाइंड शोधावा,” अशी मागणी पवार यांनी केली आहे.
अजित पवार यांनी नुकताच माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, बोम्मई यांनी तशा प्रकारचे स्टेटमेंट केले नसते तर हा वाद निर्माण झाला नसता. नंतर जत गावाबद्दलचे वक्तव्य झाले. अशा प्रकारातून महाराष्ट्राच्या अस्मितेला धक्का लावण्याचं काम हे करत असल्याची भावना राज्याच्या लोकांमध्ये निर्माण झाली आहे. काही तासानंतर सह्याद्री अतिथीगृहावर बैठक आहे. त्यावेळी मी स्वतः सीमावादाचा विषय काढणार आहे.
कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सीमावाद प्रश्नी कर्नाटकाची बाजू मांडण्यासाठी मुकूल रोहतगींची नेमणूक केली आहे. त्याच धर्तीवर आपणही हरीश साळवे यांची नेमणूक करायला हवी. त्याबाबतची मागणी मी उपमुख्यमंत्र्यांकडे करणार आहे. कारण नसताना कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांनी वाद निर्माण केला आहे. त्यांनी विधाने केली नसती तर हे मुद्दे पुढे आले नसते. गाड्या फुटल्या नसत्या. मराठी भाषिकांना त्रास झाला नसता. महाराष्ट्राच्या बॉर्डरवरील गावांमध्ये महाराष्ट्र सोडण्याची भावना निर्माण झाली. ती झाली नसती, असे पवार यांनी म्हंटले.