हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी एक अजब सल्ला नागरिकांना दिला आहे. पुण्यात एका कार्यक्रमाप्रसंगी आलेले असताना हा सल्ला त्यांनी उपस्थित जनतेला दिला.
कोरोनाने जगभर थैमान घातलं असून आता त्यो आपल्याकडं बी येऊ लागला आहे, त्यामुळं काळजी म्हणून एकमेकांशी हात मिळवणं टाळलं पाहिजे असं म्हणत जोपर्यंत या आजारावर नियंत्रण आल्याचं स्पष्ट होत नाही, तोपर्यंत एकमेकांशी हात मिळवू नका असा सल्ला अजित पवार यांनी दिला आहे.
आपण उपमुख्यमंत्री झालो म्हणून जास्त शहाणं झालो, लोकांपेक्षा मोठं झालो अशी कोणतीच भावना हात न मिळवण्यामागे नसून आजारापासूनची काळजी म्हणून हे करत असल्याचं अजित पवार म्हणाले आहेत. याच्यापुढे जाऊन आपल्याला हात मिळवू नका सांगणारे डॉक्टरच भेटीच्या शेवटी हात मिळवतात याकडेही अजित पवार यांनी लक्ष वेधत उपस्थितांना कोपरखळी मारली.